महाराष्ट्र किनारपट्टीवर उद्यापासून तीन दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:06 AM2021-05-14T04:06:37+5:302021-05-14T04:06:37+5:30

हवामान विभाग; चक्रीवादळ १८ मे रोजी गुजरात, पाकिस्तान किनारी धडकणार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचे ...

Moderate to heavy rains on Maharashtra coast for three days from tomorrow | महाराष्ट्र किनारपट्टीवर उद्यापासून तीन दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस

महाराष्ट्र किनारपट्टीवर उद्यापासून तीन दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस

Next

हवामान विभाग; चक्रीवादळ १८ मे रोजी गुजरात, पाकिस्तान किनारी धडकणार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, पुढील २४ तासांत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल. कोकण आणि मुंबईच्या समुद्रातून १८ मेच्या संध्याकाळी हे चक्रीवादळ गुजरात, पाकिस्तान किनाऱ्याजवळ पोहोचेल. याच काळात महाराष्ट्र किनारपट्टीवर १५ ते १७ मे दरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

१४ मे रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहील. तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातदेखील अशीच अवस्था असेल. १५ मे रोजी कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहील. मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. समुद्र खवळलेला राहील. वेगाने वारे वाहतील. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल. घाट विभागात मुसळधार पाऊस पडेल. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल.

* मुंबईला काेणताही धेका नाही!

कोकण आणि मुंबईच्या समुद्रातून हे चक्रीवादळ पुढे जात असले तरी मुंबईला त्याचा धोका नाही. मात्र, मुंबई, ठाणे, पालघर या तीन जिल्ह्यात त्याचा परिणाम म्हणून पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. रायगड जिल्ह्यात मोठा पाऊस होईल. या काळात समुद्र खवळलेला राहील. परिणामी मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

.....................................

Web Title: Moderate to heavy rains on Maharashtra coast for three days from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.