लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई- शिवसेनेच्या प्रयत्नामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर अदानी इलेक्ट्रिसिटी ऑफिसजवळ वातानुकूलित आधुनिक व सुसज्ज निर्मल शौचालय उभारून शिवसेनेने मधुमेह आणि रक्तदाब रुग्णांना व प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे.
कांदिवली पासून वांद्रेच्या दिशेने जाताना साऊथ बॉण्ड दिशेला मालाड पूर्वेला शौचालय असावे म्हणून शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे विधिमंडळ मुख्य प्रतोद, दिंडोशी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार आणि विभागप्रमुख सुनील प्रभू प्रयत्नशील होते.
पश्चिम दुर्तगती महामार्गावर मालाड अदानी इलेक्ट्रिसिटी ऑफिसजवळील पंचरत्न सोसायटी जवळील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर जुने शौचालय पंचरत्न सोसायटीचे रहिवासी वापरत होते. ते नादुरुस्त झाल्याने त्या जागेवर म्हाडा प्राधिकरणाने पुरुष आणि महिलांसाठी वातानुकूलित निर्मल शौचालय उभारले आहे.
आमदार प्रभू यांच्या हस्ते या शौचालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या पैसे द्या व वापरा, वातानुकूलित शौचालयाचे परिरक्षण कुटीर मंडल संस्थेद्वारे केले जाणार आहे. परिसरात राहणाऱ्या लोकांना मात्र पूर्वीप्रमाणे सुविधा मोफत असल्याची माहिती यावेळी बोलताना आमदार सुनील प्रभु यांनी दिली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएमआरडीए प्राधिकरणतर्फे दिल्या जाणाऱ्या परवानग्या घेण्यासाठी टाळेबंदीमुळे विलंब झाला तसेच टाळेबंदी कालावधीत कामगार उपलब्ध नव्हते. यामुळे शौचालय उभारणीस उशीर झाला व गैरसोय झाली ,त्याबद्दल आमदार सुनील प्रभु यांनी दिलगिरी व्यक्त केली.
यावेळी उपमहापौर ॲड. सुहास वाडकर, विधानसभा संघटक प्रशांत कदम, विष्णू सावंत, कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बेले, शाखाप्रमुख सुभाष धानुका आणि शिवसैनिक आणि येथील नागरिक उपस्थित होते.
-------------------------------------------