142 वर्षे जुन्या लोअर परळ वर्कशॉपचे आधुनिकीकरण मंजुरीच्या प्रतीक्षेत !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 12:56 AM2018-10-27T00:56:13+5:302018-10-27T00:56:47+5:30

पश्चिम रेल्वेवरील सर्वात मोठे आणि जुने असलेले लोअर परळ वर्कशॉप आधुनिकीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.

Modernization of 142-year-old Lower Parel Workshop awaiting approval | 142 वर्षे जुन्या लोअर परळ वर्कशॉपचे आधुनिकीकरण मंजुरीच्या प्रतीक्षेत !

142 वर्षे जुन्या लोअर परळ वर्कशॉपचे आधुनिकीकरण मंजुरीच्या प्रतीक्षेत !

- महेश चेमटे
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील सर्वात मोठे आणि जुने असलेले लोअर परळ वर्कशॉप आधुनिकीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. अपघात रोधक क्षमतेच्या ( लिंके हॉपमन बुश एलएचबी) बोगीची देखभाल होत असलेल्या या वर्कशॉपमध्ये अद्याप ही पारंपरिक पद्धतीने काम चालते. बोगीची आधुनिक पद्धतीने देखभाल करण्यासह वर्कशॉपच्या आधुनिकीकरणासाठी 176 कोटी रुपयांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र अद्याप या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसल्याने 142 वर्षे जुने लोअर परळ वर्कशॉप आधुनिकीकरणाच्या प्रतिक्षेत आहे.

'सर्व एक्स्प्रेसमध्ये आयसीएफ बोगी ऐवजी एलएचबी बोगी बसवण्यात येणार', असा निर्णय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी घेतला आहे.या धर्तीवर लोअर परळ वर्कशॉप महत्त्वाचे आहे. सद्यस्थितीत लोअर परळ वर्कशॉप मध्ये 30 दिवसात सुमारे 150 बोगीची देखभाल होत असून यात सुमारे 100 बोगी एलएचबी प्रकारातील आहेत. भारतीय रेल्वेत प्रतिष्ठित मानण्यात आलेल्या राजधानी एक्स्प्रेस बोगीच्या देखभालीपासून ते ब्रेक, व्हील बॅलन्सपर्यंत सर्व कामे येथे करण्यात येतात. अशा महत्त्वाच्या वर्कशॉपचे आधुनिकीकरण मात्र मंजुरी अभावी अद्याप रखडले असल्याचे स्पष्ट होत आहे.

अधिकाऱयांच्या माहिती नुसार, वर्कशॉप आधुनिकीकरण 176 कोटी रुपयांच्या प्रकल्पात बोगीना रंग देण्यासाठी स्वयंचलित पेंट मशीन आणि वर्कशॉपमधील मोठ्या दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. या प्रस्तावनुसार लोअर परळ वर्कशॉपचा कायापालट शक्य आहे.

1870 ते 1876 या काळात ब्रिटिशांनी ट्रेन बोगीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी लोअर परळ वर्कशॉप सुरू केले. तब्बल 14 हेक्तर परिसरात असलेल्या विस्तृत जागेत सद्यस्थितीत सुमारे 3 हजार 500 कर्मचारी आहेत. यात सुमारे 250 महिलांचा समावेश आहे. वर्कशॉपचे वैशिष्ट्य म्हणजे, 1889 मध्ये कार्यान्वित झालेले भिंतीमधील हेरिटेज घड्याळ आज 129 वर्षांनंतर ही सुस्थितीत कार्यरत आहे.

आयसीएफ बोगीच्या तुलनेत एलएचबी बोगी लांबीने मोठ्या असल्याने प्रवाशांना अधिक आसने उपलब्ध होतात. शिवाय एलएचबी बोगी वजनाने हलक्या असल्याने मेल-एक्स्प्रेसला कमी वेळात वेग प्राप्त करण्यास मदत होते. साधारणपणे एलएचबी बोगीची दर तीन वर्षाने देखभालीसाठी वर्कशॉपमध्ये येते तर आयसीएफ बोगी दर दीड वर्षांनी देखभालीची आवश्यकता असते.

लोअर परळ वर्कशॉपच्या आधुनिकीकरणासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 176 कोटी रुपयांचा हा प्रस्ताव पश्चिम रेल्वे मुख्यालयाने रेल्वे बोर्डाकडे आधुनिकीकरणासाठी पाठवला आहे. बोर्डाच्या मंजुरीनंतर वर्कशॉपच्या आधुनिकीकरणाला सुरुवात होईल.
- अखिलेश कुमार, मुख्य वर्कशॉप व्यवस्थापक, लोअर परळ वर्कशॉप, पश्चिम रेल्वे

Web Title: Modernization of 142-year-old Lower Parel Workshop awaiting approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.