लोअर परळ वर्कशॉपचे आधुनिकीकरण रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 01:03 AM2018-10-29T01:03:55+5:302018-10-29T01:04:13+5:30
रेल्वे बोर्डाकडून मंजुरीची प्रतीक्षा; १४२ वर्षे जुन्या कारशेडला गरज नवसंजीवनीची
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील मेल-एक्स्प्रेस बोगींची देखभाल-दुरुस्ती करणारे लोअर परळ वर्कशॉप आधुनिकीकरण रखडले आहे. अपघात रोधक क्षमतेच्या एलएचबी (लिंके हॉपमन बुश) बोगीची देखभाल होत असलेल्या या वर्कशॉपमध्ये अद्यापही पारंपरिक पद्धतीने काम चालते. वर्कशॉप आधुनिकीकरणासाठी १७६ कोटी रुपयांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्याप या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसल्याने, १४२ वर्षे जुने लोअर परळ वर्कशॉपला आधुनिकीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.
‘एक्स्प्रेसमध्ये आयसीएफ बोगीऐवजी एलएचबी बोगी बसविण्यात येणार,’ असा निर्णय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी घेतला आहे. यामुळे लोअर परळ वर्कशॉपचे महत्त्व अधोरेखीत झाले आहे. सद्यस्थितीत लोअर परळ वर्कशॉपमध्ये ३० दिवसांत सुमारे १५० बोगींची देखभाल होत असून, यात सुमारे १०० बोगी एलएचबी प्रकारातील आहेत. भारतीय रेल्वेत प्रतिष्ठित मानण्यात आलेल्या राजधानी एक्स्प्रेस बोगीच्या देखभालीपासून ते ब्रेक, व्हील बॅलन्सपर्यंत सर्व कामे येथे करण्यात येतात.
१८७० ते १८७६ या काळात ब्रिटिशांनी ट्रेन बोगीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी लोअर परळ वर्कशॉप सुरू केले. तब्बल १४ हेक्टर परिसरात असलेल्या वर्कशॉपमध्ये सद्यस्थितीत सुमारे ३ हजार ५०० कर्मचारी आहेत, यात सुमारे २५० महिलांचा समावेश आहे. वर्कशॉपचे वैशिष्ट्य म्हणजे, १८८९ मध्ये कार्यान्वित झालेले भिंतीमधील हेरिटेज घड्याळ आज १२९ वर्षांनंतरही सुस्थितीत आहे.
एलएचबी बोगी म्हणजे काय!
आयसीएफ बोगीच्या तुलनेत एलएचबी बोगी लांबीने मोठ्या असल्याने प्रवाशांना अधिक
आसने उपलब्ध होतात. शिवाय एलएचबी बोगी वजनाने हलक्या असल्याने मेल-एक्स्प्रेसला कमी
वेळात वेग प्राप्त करण्यास मदत
होते. साधारणपणे एलएचबी बोगींची दर तीन वर्षांनी देखभाल करावी लागते, तर आयसीएफ बोगी दर दीड वर्षांनी देखभालीची आवश्यकता असते.
आधुनिकीकरणात या कामांचा समावेश
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, वर्कशॉप आधुनिकीकरण १७६ कोटी रुपयांच्या प्रकल्पात बोगींना रंग देण्यासाठी स्वयंचलित पेंट मशिन आणि वर्कशॉपमधील मोठ्या दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. शिवाय कमकुवत होत असलेल्या भिंती आणि विविध विभागांची पुनर्बांधणी करण्याचा समावेश प्रस्तावात आहे.
वर्कशॉपच्या आधुनिकीकरणासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. १७६ कोटी रुपयांचा हा प्रस्ताव पश्चिम रेल्वे मुख्यालयाने रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. बोर्डाच्या मंजुरीनंतर आधुनिकीकरणाला सुरुवात होईल.
- अखिलेश कुमार, मुख्य वर्कशॉप
व्यवस्थापक, लोअर परळ वर्कशॉप