मुंबई - केरळपासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर विनाशाचे थैमान घालणारे तौत्के चक्रीवादळ (Tauktae Cyclone) सोमवारी दुपारनंतर चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या काही किलोमीटर अंतरापासून गुजरातकडे सरकले. त्यावेळी ताशी 190 किलोमीटरहून अधिक वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांनी तडाखा दिला. या चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे गुजरातमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. हजारो गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातचा दौरा करुन राज्याला 1000 कोटींची मदत जाहीर केली. त्यावरुन, विरोधकांनी मोदींवर टीका केली आहे. मोदी हे केवळ गुजरातचेच पंतप्रधान आहेत का, सवाल अनेकांनी विचारला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. या दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातसाठी तब्बल 1000 कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. तसेच देशभरात तौत्के चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागालाही मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, गुजरात 1000 कोटींची मदत जाहीर केल्याने इतर राज्यांना मोदींनी वाऱ्यावर सोडल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँगेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. तौक्ते चक्रीवादळाने पश्चिम किनाऱ्यावरील प्रदेशात मोठं नुकसान केलं आहे. या वादळाचा फटका 5 राज्यांना बसला आहे. मात्र, नरेंद्र मोदींनी केवळ गुजरात दौराच केला, तसेच मदतही केवळ गुजरातसाठीच जाहीर केली. केवळ गुजरातचेच मुख्यमंत्री असल्यासारखे ते का वागतात, असा सवालही चव्हाण यांनी विचारला आहे. तसेच, वादळाचा फटका बसलेल्या इतर राज्यातील जनतेची अवहेलना का, असेही ते म्हणाले.
मृतांच्या वारसांना मदत जाहीर
गुजरातला धडकले त्यावेळी तौक्तेचे स्वरूप अतिशय तीव्र झाले होते. चक्रीवादाळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे गुजरातचे प्रशासन सामना करण्यासाठी सज्ज होते. 16 हजारांहून जास्त घरांचे नुकसान झाले आहे. तसेच 40 हजार झाडे आणि 10 हजारांहून अधिक विजेचे खांब पडले आहेत. तौत्के चक्रीवादळात मृत्यू झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. गुजरातमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठवलं जाणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
वीज पुरवठा खंडीत
चक्रीवादळामुळे सौराष्ट्र, दीव, उना इत्यादी भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा अनेक तास खंडित झाला होता. सुमारे 16 कोविड रुग्णालयांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी 12 रुग्णालयांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला होता. गुजरातच्या वेरावल बंदराजवळ अडकलेल्या ‘मत्स्य’ तसेच आणखी दोन नौकांमधून 16 जणांची गुजरात तटरक्षक दलाच्या जवानांनी सुटका केली. तीन नौका मंगळवारी सकाळी समुद्रात गेल्या होत्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.