मोदींमुळे जातीय तेढ निर्माण झाली - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 08:40 PM2018-07-21T20:40:31+5:302018-07-21T20:41:16+5:30
दोन समाजामध्ये आणि राज्यांमध्येही एकवाक्यता राहिलेली नाही.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेने विश्वासाने निवडून दिले होते. मात्र त्या विश्वासास ते पात्र ठरले नाहीत. त्यांच्या काळात माणसा-माणसांमध्ये, दोन समाजामध्ये आणि राज्यांमध्येही एकवाक्यता राहिलेली नाही. समाजात जातीय तेढ निर्माण झाली आहे. जनतेचा पूर्ण भ्रमनिरास करण्याचे काम त्यांनी केले आहे, असे मत पवार यांनी व्यक्त केले. ते मुंबई राष्ट्रवादीने आयोजित पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते.
जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात मोदी अयशस्वी ठरल्याचे पवार म्हणाले. गोमांसच्या संशयावरून ‘मॉब लिंचिंग’चे प्रकार घडत आहेत. ही अत्यंत चिंताजनक आणि निंदनिय गोष्ट आहे. दादरीमध्ये काही वर्षांपूर्वी असाच प्रकार घडला होता. एकाच्या घरात गोमांस असल्याच्या संशयावरून जमावाच्या मारहाणीत त्याला जीव गमवावा लागला होता. मात्र, ते गोमांस नव्हतेच असा चौकशीचा अहवाल नंतर समोर आला होता. आता त्या व्यक्तीच्या कुटुंबाची जबाबदारी कोणाची? असा सवालही पवार यांनी केला.
शिवसेना मुंबईत पाय रोवून उभी आहे कारण त्यांनी त्यांचे वॉर्ड जनसंपर्काच्या माध्यमातून बांधून ठेवले आहेत. शिवसेनेचे कार्यकर्ते प्रत्येक प्रश्नावर आंदोलन करतात. आपले कार्यकर्ते फक्त आदेश मागतात. यापुढे आदेश मागत फिरु नका. एकतर नमस्कार करा नाहीतर चमत्कार दिसेल असे काम करा, या शब्दात मुंबई राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कानउघडणी करत राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे कौतुक केले.