नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपने विधानसभेत गदारोळ केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना 25 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी शब्द पाळून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी करत भाजप आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये खडाजंगी झाली. त्यानंतर, अर्थमंत्री जयंत पाटील यांनी पुढाकार घेत दोन्ही आमदारांमध्ये समन्वय साधला. त्यानंतर, जयंत पाटील यांनी फडणवीसांनाच प्रश्न विचारले.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (सोमवारी) देखील भाजपाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्यावरुन आक्रमक पवित्रा घेतला होता. यानंतर काही वेळ वादळी चर्चा रंगल्यानंतर सभागृहाचं कामकाज बंद करण्यात आले होते. त्यातच आज थेट आमदारांमध्येच हाणामारी झाल्याने सभागृहात मोठा गोंधळ उडला आहे. शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यामध्ये हाणामारी झाली. यानंतर भाजपाचे आमदार आशिष शेलार, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील, शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, जयंत पाटलांनी भाषण करत देवेंद्र फडणवीसांनाच प्रतिप्रश्न केले. तसेच, वेलमध्ये येणं याचं समर्थन करणं चुकीच आहे. एवढा आठवडा केवळ घोषणाबाजी करा, आम्ही तुम्हाल घोषणाबाजी कशी करायची हे शिकवू, असेही पाटील यांनी म्हटले. तसेच, केंद्राकडे मदतीची मागणी करण्याचं आवाहनही पाटील यांनी केलं.
राज्य सरकारने अवकाळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 6600 कोटी रुपयांची मदत दिली आहे. त्यातले 2100 कोटी रुपये जिल्ह्यांपर्यंत पोहचले आहेत. तुम्हाला खरंच शेतकऱ्यांची काळजी असेल तर केंद्राकडून राज्य सरकारचे पैसे मागावेत. राज्य सरकारचे 14,600 कोटी केंद्राने अडवले आहेत. फडणवीस यांनी विधिमंडळ सभागृहात घोषणाबाजी करण्यापेक्षा मोदींकडे पैसे देण्याची विनंती करावी, असेही अर्थमंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.