Join us  

मोदींना निवडणुकीतील जाहीरनाम्याचा विसर

By admin | Published: April 23, 2017 2:38 AM

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. भाजपाने केंद्रात सत्तेत येण्यापूर्वी जाहीरनाम्यात शेतीमालाला योग्य भाव देऊन लागवड खर्चावर

मुंबई : महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. भाजपाने केंद्रात सत्तेत येण्यापूर्वी जाहीरनाम्यात शेतीमालाला योग्य भाव देऊन लागवड खर्चावर ५० टक्के नफा धरून उत्पन्नाला किमान भाव देण्याचे जाहीर केले. मात्र, तीन वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारला त्याचा साफ विसर पडला आहे, अशी टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शनिवारी केली. जनता दल युनायटेडचा महाराष्ट्र प्रदेश मेळावा गोरेगाव (पूर्व) येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी ते बोलत होते. देशात कृषी संकट आल्यामुळे महाराष्ट्रात मराठा समाज, गुजरातमध्ये पाटीदार समाज आणि उत्तर प्रदेशमध्ये जाट हा वरचढ समाज आता शेतीऐवजी आरक्षण मागत आहे, ही शोकांतिका असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. भाषणाची सुरुवात मराठीत करून नितीशकुमार म्हणाले, ‘महाराष्ट्रात आम्हाला किती जागा मिळतील, याचा विचार करीत नाही. मात्र या ठिकाणी सहिष्णुता, सामाजिक ऐक्य, एकता निर्माण करून तरुण वर्ग, शेतकरी आणि कामगार वर्गाच्या रक्षणासाठी आम्ही आग्रही राहू, बिहारमध्ये २०१५मध्ये सत्तेत आल्यानंतर आपण दारुबंदी जाहीर केली. त्यामुळे ५००० कोटींचे आर्थिक नुकसान झाले तरी पर्यटन, कृषी आणि अन्य क्षेत्रांतून वाढीव महसुलातून त्याची भरपाई केली. या निर्णयामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. गोव्यात दारूमुळे ८० टक्के महिलांना ‘डिप्रेशन’ आले आहे, असे सांगून त्यांनी महाराष्ट्रात दारूबंदीसाठी आपल्या पक्षातर्फे अभियान सुरू करण्याचे आवाहन केले. बिहारची शेती, रोजगार निर्मिती, शिक्षण, मूलभूत सुविधांमध्ये विलक्षण प्रगती होत असल्याचे त्यांनी सांगितले. बिहारमध्ये नववीच्या विद्यार्थिनींना २००८ मध्ये सायकल योजना सुरू केली होती. त्या वेळी मुलींची संख्या १ लाख ७० हजार होती, आता ती १ लाख ७० हजारांपर्यंत पोहोचली आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाली पाहिजे, अशी मागणी करीत कपिल पाटील म्हणाले, ‘राज्यात आतापर्यंत ३०१६ आत्महत्या झाल्या. मात्र, नितीशकुमार यांच्या बिहार राज्यात एकही आत्महत्या झाली नाही. बिहारचा सर्वांगीण विकास त्यांनी केल्यामुळे विकासपुरुष म्हणून देश त्यांच्याकडे आशेने बघत आहे. या वेळी पक्षाचे राष्ट्रीय सचिव श्याम रजक, माथाडी नेते अविनाश रामिष्टे, बँक कामगार नेते विश्वास उटगी, निवृत्त सनदी अधिकारी जयंत गायकवाड आदी उपस्थित होते. कपिल पाटील प्रदेशाध्यक्ष; शशांक रावांकडे मुंबईची धुरामेळाव्यात नितीशकुमार यांनी शिक्षक पदवीधर आमदार कपिल पाटील यांची जनता दल युनायटेडच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी तर कामगार नेते शशांक राव यांची मुंबईच्या अध्यक्षपदी निवड जाहीर करीत महाराष्ट्रात पुन्हा समतावादी विचार रुजविण्यासाठी जोमाने काम करण्याचे त्यांना आवाहन केले.