मोदीमुक्त भारत हे जरा जास्तच झालं, राज ठाकरेंनी स्तर पाहून बोलावे - भाजपा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 01:21 PM2018-03-19T13:21:01+5:302018-03-19T13:21:01+5:30
‘मोदीमुक्त भारत’ हे जरा जास्तच झाले, राज ठाकरेंनी आपला स्तर पाहून बोलावे...
मुंबई : महाराष्ट्रातील जनतेने ज्यांना ‘रोजगारमुक्त’ केलं, त्यांनी ‘मोदीमुक्त भारता’ची मुक्ताफळे उधळली आहेत, अशा शब्दात मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मोदीमुक्त भारत या घोषणेचा खरपूस समाचार घेतला. तसेच, ‘मोदीमुक्त भारत’ हे जरा जास्तच झाले, राज ठाकरेंनी आपला स्तर पाहून बोलावे, असेही ते म्हणाले. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज ठाकरेवर बोचरी टीका केली. ते म्हणाले की, याआधी राज ठाकरेंच्या भाषणांवर बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव दिसायचा, पण हल्ली शरद पवार यांचा प्रभाव दिसून येतो.
पुढे बोलताना ते म्हणाले की, 2014 च्या निवडणूकीत विधानसभा ‘मनसेमुक्त’ झाली, मुंबई महापालिकेतील उरले-सुरलेले नगरसेवकही पळून गेले. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आता यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, अशी टीका शेलारांनी राज ठाकरेंवर केली.
आमदार अतुल भातखळकरांनीही राज ठाकरेवर घणाघाती टीका केली आहे. ते म्हणाले की, मोदीमुक्त भारत करण्याआधी महाराष्ट्रानेच त्यांना मनसेमुक्त केलेला आहे. पराभूत मानसिकतेतून केलेली ही केविलवाणी धडपड आहे. ‘मोदीमुक्त भारत’ करण्यासाठी यांच्याकडे नेते कोण आहेत? यांचे नेते गल्लीपुरते मर्यादित आहेत. ज्यांनी नगरसेवक पळवले, त्यांच्यावर टीका नाही. पण भारत मोदीमुक्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न होतो आहे.
देशाला १९४७ साली पहिले स्वातंत्र्य मिळाले. १९७७ला आणीबाणीत दुसरे स्वातंत्र्य मिळाले. आता, २०१९ साली तिसरे स्वातंत्र्य देशाला मिळायला हवे. गुजरात सोडून बाकीच्या राज्यांचा नरेंद्र मोदी दुस्वास करतात. लोकांची सतत फसवणूक करणारे हे सरकार आता घालवायलाच हवे. २०१९ साली ‘मोदीमुक्त’ भारत करण्याची गरज आहे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केले. देशाला झालेला हा आजार घालवायलाच हवा. त्यासाठी मोदींविरोधात सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे, असे आवाहनही राज यांनी केले. गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवरील मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.
राज्यातील दुकानांवरील पाट्या मराठीतच असाव्यात, या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मागणीला सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला. राज यांनी आपल्या सभांमधून अनेकदा दुकानांवर अन्य भाषांमध्ये लावण्यात येणाऱ्या पाट्यांवर आक्षेप घेतला होता. या पाट्या मराठीतच असाव्यात यासाठी मनसेकडून अनेकदा आंदोलनंही करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाने मनसेच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला नव्हता. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी पहिल्यांदाच जाहीरपणे मनसेच्या भूमिकेचे समर्थन केले. अनेक दुकानांच्या पाट्यांवरील बहुतांश मजकूर हा अन्य भाषेत असेल तर ही खरंच चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही राज यांच्या भूमिकेला पाठिंबा देत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.