मोदी सरकार सिझोफ्रेनिया झाल्यासारखे वागत आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:05 AM2021-06-06T04:05:32+5:302021-06-06T04:05:32+5:30
अमर्त्य सेन यांची टीका; चुकीच्या निर्णयांमुळे कोरोनाचे संकट वाढले लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मोदी सरकार ...
अमर्त्य सेन यांची टीका; चुकीच्या निर्णयांमुळे कोरोनाचे संकट वाढले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मोदी सरकार सिझोफ्रेनिया झालेल्या मनोरुग्णासारखे वागल्यानेच कोरोनाचे संकट वाढले. दुसऱ्या लाटेत मृत्यूंची संख्या वाढली आणि सामान्य नागरिक बेहाल झाले. हे संकट थोपविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रेय उपटण्याच्या प्रयत्नात होते, अशी घणाघाती टीका नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी केली. राष्ट्र सेवा दलाच्या वतीने शुक्रवारी (दि. ४) झालेल्या ऑनलाइन ‘फ्रायडे फ्लेम’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
राष्ट्र सेवा दलाच्या ८० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने झालेल्या या कार्यक्रमात सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी, महात्मा गांधी यांचे नातू डॉ. राजमोहन गांधी, कार्यकारी विश्वस्त आमदार कपिल पाटील यांची भाषणे झाली. जैविक आणि वैचारिक कोरोनाविरुद्ध लढत देशातील नागरिकांच्या एकजुटीचा निर्धार यावेळी करण्यात आला. ७ मेपासून हे ऑनलाईन अभियान सुरू होते. त्याच्या समारोप सोहळ्यात अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठातून सेन यांनी भारतीयांना संबोधित केले. देशभरातील तीन हजार जणांनी फेसबुकवर हा कार्यक्रम बघितला.
ते म्हणाले, भारताकडे औषधनिर्मितीचे कौशल्य आहे. साथरोगांना प्रतिकार करण्याची भारतीयांची क्षमता मोठी आहे. त्यामुळे भारताची कोरोना महामारीशी लढण्याची क्षमता चांगली होती; पण श्रेय लाटण्याचा मोदी सरकारचा नाद, विजयी होण्याची भावना या अनिष्ट गोष्टींमुळे संकट वाढले. या संकटाला निपटण्याचा चुकीचा प्रयत्न सरकारने केला आणि नागरिकांवर कोरोनाचे संकट लादले. भारत आधीच सामाजिक विषमता, मंदगती विकास आणि बेरोजगारीच्या संकटाशी झुंजत होता. सरकारच्या बेजबाबदार धोरणांनी कोरोना महामारीच्या संकटात हे प्रश्न जास्त स्फोटक बनले आहेत. अर्थव्यवस्थेची विफलता आणि सामाजिक एकजुटीचा उडालेला फज्जा यांमुळेही भारतावरचे कोरोना संकट अधिक गडद झाले. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक नीती या क्षेत्रांत मोठे बदल केल्याशिवाय भारताला पुढे जाता येणार नाही. त्यासाठी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मार्गदर्शक ठरतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. राजमोहन गांधी यांनी १९४६-४७ या काळातल्यासारखी आजची देशाची परिस्थिती असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. डॉ. देवी यांनी जैविक आणि वैचारिक कोरोनाविरुद्ध एकजुटीचा निर्धार देशवासीयांनी करावा, असे आवाहन केले. कपिल पाटील यांनी राष्ट्र सेवा दल आर्थिक समता आणि सेक्युलॅरिझम या मूल्यांसाठी सुरू असलेला लढा अधिक तीव्र करणार असल्याचा संकल्प केला.
.......................................