लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या संकटात मदत करतानाही केंद्र सरकार महाराष्ट्राशी भेदभाव करत आहे. कोरोना काळात ४० देशांनी केलेल्या मदत वाटपात महाराष्ट्राला डावलल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
जवळपास २५ विमानांनी अनेक देशांतून देशाला मदत आली आहे. या देशांमधील अनेक भारतीय वंशाच्या लोकांना भारतातील आपापल्या राज्यांना मदत करावयाची असेल. मात्र, केंद्र सरकार प्रथम या मदत सामग्रीवर बसून राहिले आणि वितरण सुरू केले तेव्हा महाराष्ट्र वगळून भाजपाशासित उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हरयाणा, बिहार व अन्य राज्यांना मदत दिली जात आहे. केंद्र सरकारच्या या कृतीचा काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करत असून राज्यातील भाजप नेत्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला याचे उत्तर द्यावे, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.
आंतरराष्ट्रीय मदतीवर राज्य सरकारांचाही हक्क असताना ती थेट राज्यांना का दिली जात नाही, असा प्रश्न करतानाच केवळ केंद्रीय यंत्रणांकडून त्याचे होणारे वाटप हे पीएम केअर फंडाप्रमाणे मोदींच्या हातात अमर्याद अधिकार देणारे असून संघराज्य पद्धतीला छेद देणारेही आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला सातत्याने सापत्नभावाची वागणूक देत आहे. सुरुवातीला कोरोनासंदर्भातील वैद्यकीय साहित्य पुरवण्यात भेदभाव केला, त्यानंतर रेमडेसिविर, ऑक्सिजन तसेच लस पुरवठा करण्यातही दुजाभाव केला जात आहे. केवळ विरोधी पक्षाचे सरकार असल्याने केंद्र सरकारवर अन्याय केला जात आहे, असेही सावंत म्हणाले.