Join us  

मोदी सरकार सरड्याप्रमाणे रंग बदलत आहे, उद्धव ठाकरेंची टीका

By admin | Published: May 04, 2016 7:33 AM

हुर्रियतप्रकरणी केंद्र सरकारने केलेल्या घूमजावावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दात टीका करत नाराजी व्यक्त केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 04 - हुर्रियतप्रकरणी केंद्र सरकारने केलेल्या घूमजावावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दात टीका करत नाराजी व्यक्त केली आहे.  सरडाही लाजेल असे रंग बदलले जात असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून केली आहे. हुर्रियतप्रकरणी केंद्र सरकारचे हे घूमजाव म्हणजे अयोध्येतील राममंदिर ही बाबरीच होती अशी पलटी मारण्यासारखाच प्रकार आहे. सगळेच कठीण बनले आहे! सरडाही लाजेल असे रंग बदलले जातात तेव्हा हे यांना कसे जमते बुवा असा प्रश्‍न जनतेला पडतो असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
 
हुर्रियत आता कश्मीरप्रश्‍नी पाकिस्तानशी चर्चा करणार आहे व तशी विशेष सवलत केंद्र सरकारने हुर्रियत मंडळींना दिली आहे. उद्या मसूद अझहर, दाऊद इब्राहिम, लख्वीसारख्यांशीही कश्मीरप्रश्‍नी चर्चा होईल. अखंड हिंदुस्थानचे स्वप्न अशा पद्धतीने साजरे होईल असे वाटले नव्हते असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
हुर्रियत आणि कश्मीरप्रश्‍नी जी पलटी केंद्र सरकारने मारली तशी पलटी काँग्रेस राज्यकर्त्यांनी मारली असती तर भारतीय जनता पक्ष व संघपरिवाराने काँग्रेसला पाकिस्तानचे एजंट ठरवले असते. काँग्रेसचे राज्यकर्ते कश्मीर पाकिस्तानला विकायला निघाले आहेत व असे देशद्रोही लोक सत्तेवरून हाकलून दिले पाहिजेत असे त्यांनी सांगितले असते. पण पाकनिष्ठ व हिंदुस्थानद्रोही ठरवलेल्या हुर्रियत मंडळींना मांडीवर घेऊन त्यांचे लाडकोड सध्याच्या दिल्लीश्‍वरांनी चालवले आहेत असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
 
हुर्रियत ही सरळसरळ फुटीरतावादी संघटना आहे. कश्मीर सोडून इतर सर्व विषयांवर पाकिस्तानशी चर्चा करू असे मोदी सरकारचे म्हणणे कालपर्यंत होते. आता त्या भूमिकेत बदल झाला आहे व काँग्रेसनेही कश्मीरप्रश्‍नी घेतली नव्हती अशी बुळचट भूमिका विद्यमान सरकारने घेतली आहे. खरेतर या बदललेल्या भूमिकेबाबत देशाला आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. पाकशी हमदर्दी बाळगणार्‍या व दहशतवाद्यांना बळ देणार्‍या पीडीपीशी सत्तेसाठी भाजपने घरोबा केला तेव्हाच कश्मीरप्रश्‍नी मारलेली पलटी जनतेच्या लक्षात आली होती. पुन्हा पीडीपीशी असा घरोबा काँग्रेसने केला असता तर तो अफझल गुरूला स्वातंत्र्यसैनिक मानणार्‍यांशी घरोबा ठरला असता असा टोला उद्धव ठाकरेंनी हाणला आहे.
 
निदान संघाच्या धुरिणांनी तरी हुर्रियतप्रश्‍नी ठोस भूमिका घेऊन देशाला मार्गदर्शन करायला हवे होते. हुर्रियतशी नेमका काय गुप्त करार झाला याचा खुलासा झालाच पाहिजे अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली आहे.