Join us

धोरण सातत्य राखण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध - निर्मला सीतारमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:10 AM

मुंबई : अर्थ धोरणात सातत्य राखण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. आर्थिक जगतातील विविध नियामक संस्थांची भूमिका यात महत्वाची असून ...

मुंबई : अर्थ धोरणात सातत्य राखण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. आर्थिक जगतातील विविध नियामक संस्थांची भूमिका यात महत्वाची असून सरकार यादृष्टीने आवश्यक पावले उचलत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. आयकर विभाग, वस्तु आणि सेवा कर विभाग आणि सीमा शुलगक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. तर, सायंकाळी भारतीय उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उद्योग जगतातील आघाडीच्या मंडळींची भेट घेतली. यावेळी महसूल सचिव तरुण बजाज, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळचे अध्यक्ष जे.बी.मोहपात्रा, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते.

अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्वाचे बदल घडत आहेत. या बदलांसाठी सरकारी धोरणे पूरक असायला हवीत, असे सांगतानाच अर्थव्यवस्थेतील बदल, विविध प्रवाहांना सुविधा पुरविण्यासाठी सरकार उत्सुक असल्याचे निर्मला सीतारमण यांनी म्हटले. तसेच अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी सरकार आणि उद्योग जगताने एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. त्यामुळेच उद्योग जगताचे म्हणणे ऎकून घेत त्यावर काम करण्याचे, योग्य प्रतिसाद देण्याची केंद्र सरकारची भुमिका आहे. शक्य तर सर्व सहकार्य करण्याचेच आमचे धोरण आहे. नव्याने येणारे स्टार्ट अप व्यवसायातील धोका पत्करून धडाडीने काम करत आहेत. तशीच धडाडी उद्योग जगताने दाखवावी असे सांगतानाच उद्योग जगतासमोरील अडचणींची दखल घेण्याचे आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिले. स्पर्धात्मक वातावरण, ज्यादा वीज दर आणि नियामकांच्या जाचक अटी अशा उद्योग जगताने मांडलेल्या विविध अडचणींवर सोडविण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.