मुंबई : देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या धगधगत्या इतिहासाची साक्ष देणारी ५० वर्षांची शौर्यगाथा पुसून टाकण्याचे पातक केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केले आहे. वीर जवानांच्या शौर्याची साक्ष देणारी दिल्लीतील ‘अमर जवान ज्योत’ कायमची विझवण्याचा अश्लाघ्य प्रकार करुन मोदी सरकारने देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांचा घोर अपमान केला असून हा अपमान देश कदापी सहन करणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, या देशाला त्याग, शौर्य व बलिदानाचा मोठा इतिहास आहे. हजारो वीर जनावांच्या अतुलनिय शौर्याची प्रेरणा करोडो जनतेच्या मनात तेवत रहावी, त्यातून स्फूर्ती मिळावी यासाठी अमर जवान ज्योती सारखी स्मारके उभे केली जातात पण केंद्रात सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचाराच्या सरकारला या बलिदानाची, शौर्याची व त्यागाची महती कशी कळणार? त्यांना तर असा कोणताही गौरवशाली इतिहास नाही परंतु जो गौरवशाली इतिहास आहे तो पुसण्याचा कृतघ्नपणा भाजपा सरकार करत आहे. ‘अमर जवान ज्योत’ विझवण्यासाठी देण्यात आलेले कारणसुद्धा अत्यंत तकलादू व बालिशपणाचे आहे.
देशाचे कणखर नेतृत्व, दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी १९७१ साली पाकिस्तानला धडा शिकवत दोन तुकडे केले व जगाच्या नकाशावर बांग्लादेशाची निर्मिती केली. या युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांच्या शौर्याचा इतिहास सांगणारी ही ‘अमर जवान ज्योत’ विझवून देशासाठी त्यांनी दिलेले योगदान पुसण्याचे पातक संघ विचाराचे सरकार करत आहे. परंतु त्यांच्या अशा कृतीने त्यांचे योगदान पुसले जाऊ शकत नाही आणि वीर जवानांनी देशासाठी दिलेले बलिदानही विसरले जाऊ शकत नाही.
बांग्लादेश मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्व. पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या नावाचा साधा उल्लेखही केला नाही एवढा कोतेपणा त्यांनी दर्शवला होता. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत असताना त्यात स्वातंत्र्यासाठी व स्वातंत्र्यानंतर देशासाठी अमुल्य योगदान दिलेल्या पंडित जवाहरलाल नेहरु यांचाही उल्लेख केंद्रातील भाजपा सरकारने टाळला. आरएसएस व भारतीय जनता पक्षाचे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत व देशाच्या जडणघडणीत काडीचेही योगदान नाही. ते नेहरू गांधी यांचे योगदान नाकारण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. भाजपा सरकारने आज ‘अमर जवान ज्योत’ विझवली तरी देशवासियांच्या मनात ती कायम तेवत राहील, असेही काँग्रेस प्रांताध्यक्षांनी सांगितले.