मुंबई - चीन सीमेवर सातत्याने कुरापती काढत असताना केंद्रातील मोदी सरकार मात्र प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरले असून त्यांनी चीनसमोर सपशेल शरणागती पत्करली आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसने मोदी सरकारवर केला आहे. सीमेवर जे घडत आहे त्यातून आपले परराष्ट्रीय धोरण चुकलेले दिसते. आजपर्यंत चीनला आपण रोखले होते, मात्र आज ती स्थिती राहिली नसून सीमांचे रक्षण करण्यात मोदी सरकार कमी पडले, असा घणाघाती हल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर केला.
सरकारच्या या नाकर्तेपणाचा जाब विचारणासाठी तसेच २० शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी काँग्रेसने आज राज्यव्यापी आंदोलन केले. आज सकाळी बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सहकाऱ्यांसह शांततेत आंदोलन केले. राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून ‘शहिदों को सलाम’ दिवस पाळण्यात आला. राज्यव्यापीआंदोलनाबरोबरच #SpeakUpForOurJawans ही online मोहिमही राबिवण्यात आली.दुपारी गांधी भवन येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी चव्हाण यांनी चीनच्या घुसखोरीवरुन मोदी सरकारचा खरपूर समाचार घेतला. चीनने लडाखमध्ये केलेली घुसखोरी ही चिंतेची बाब आहे. देशहिताचा विचार करत सरकार देशाच्या संरक्षणासाठी जो निर्णय घेईल त्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे परंतु चीनने भारताच्या भूमीवर घुसखोरी केलीच नाही हे पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य चीनला पोषक ठरले असून आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा परिणाम झाला आहे. चीनने मोदींच्या वक्तव्याचा पुरेपुर फायदा उठवत घुसखोरी केली नाही असे तो जगभर सांगत सुटला आहे. पंतप्रधानांचे हे वक्तव्य काँग्रेसला मान्य नाही. पंतप्रधान कार्यालयाने त्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला परंतु ते पुरेसे नसून सरकारने पंतप्रधानांच्या ‘त्या’ विधानावर खुलासा करावा. एवढ्या मोठ्या व अत्यंत गंभीर प्रश्नावर बोलताना पंतप्रधानांनी अत्यंत जबाबदारीने व गांभीर्याने बोलणे अपेक्षित आहे, पण तसे झाले नाही. सरकारला प्रश्न विचारणे विरोधकांचे काम आहे आणि त्याला उत्तर देणे सरकारचे घटनात्मक कर्तव्य आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपींग हे सहा वर्षात १९ वेळा भेटले त्याचा भारताला काहीच फायदा झालेला नाही. यावेळी चव्हाण यांनी मोदी सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. एप्रिल, मे २०२० मध्ये चीनने भारताच्या हद्दीत कितीवेळा आक्रमण केले ? पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीत ‘ते’ वादग्रस्त विधान का केले ? पंतप्रधानांच्या विधानामुळे वाटाघाटीत भारताची भूमिका कमकुवत पडली का ? सीमेवरील स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी भारत सरकारने काय उपाय केले? या प्रश्नांची उत्तरे मोदी सरकारने द्यावीत, असे चव्हाण म्हणाले,चीनने सीमा भागातील आपल्या कुरापती थांबवलेल्या नाहीत. सॅटेलाईटच्या माध्यमातून काही गोष्टी स्पष्ट झाल्या असून गलवान भागातून चीन परत गेलेला नाही. उलट त्या भागात चीनी सैन्यांच्या चौक्या आहेत, लष्करी वाहनांची ये जा सुरु आहे. जवळपास १० हजार सैनिक त्या भागात तैनात आहेत, मोठा तोफगोळाही आहे. चीनकडून गलवान नदीपात्रात बांधकामही सुरु आहे. असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.