Join us  

"मोदी सरकारवर देशद्रोहाचा खटला चालला पाहिजे", सत्यपाल मलिकांच्या आरोपानंतर संजय राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 11:21 AM

या सरकारवर देशद्रोहाचा खटला चाललाच पाहिजे. जे मंत्री जबाबदार आहे, त्यांचे कोर्टमार्शल व्हायला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुंबई : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोठा दावा केला आहे. मोदी सरकारच्या निष्काळजीपणामुळे पुलवामा हल्ला झाल्याचा गंभीर आरोप सत्यपाल मलिक यांनी केला आहे. पंतप्रधानांना सांगितले की पुलवामा हल्ला आपल्या चुकीमुळे घडला आहे. पण तेव्हा त्यांनी मला गप्प केले, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. यावरून आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

आताच्या सत्ताधाऱ्यांनी जवानांची पुलवामात हत्या करावी आणि नंतर त्याच राजकारण करावे अशी काही योजना होती का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच, आज त्यांनीच नेमलेले तेव्हाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी तेच स्फोटक सत्य समोर आणलं आहे. या सरकारवर देशद्रोहाचा खटला चाललाच पाहिजे. जे मंत्री जबाबदार आहे, त्यांचे कोर्टमार्शल व्हायला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, देशाला आधीच माहित होते की, पुलवामा हल्ल्यात काहीतरी गडबड घोटाळा आहे. पुलवामा हल्ल्याबाबत वारंवार प्रश्न उपस्थित केले. यात किती किलो आरडीएक्स आले? पुलवामामध्ये आरडीएक्स पोहोचले कसे? पुलवामाच्या रस्त्याने कधीही सुरक्षाकर्मी प्रवास करत नाहीत. त्यांना एअर फोर्स किंवा सरकारने विमान का दिले नाही? त्यांची पुलवामात हत्या करावी आणि नंतर त्याचे राजकारण करावे, अशी काही योजना होती का? हे प्रश्न तेव्हा सुद्धा विरोधी पक्षाने विचारले. पण असे प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही म्हटले गेले, ते पाकिस्तानची भाषा बोलतायत असे म्हणत गप्प करण्यात आले, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

"पुलवामा हल्ल्याला मोदी सरकार जबाबदार, पण.." - सत्यपाल मलिकपुलवामा हल्ला झाला, त्यावेळी सत्यपाल मलिक जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. त्यांनी एका मुलाखतीमध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. "सीआरपीएफने एअरक्राफ्टची मागणी केली होती. कारण एवढा मोठा ताफा कधीही रस्त्याने जात नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाकडे त्यांनी मागणी केली. राजनाथजींकडे मागणी केली. पण त्यांनी नकार दिला. मला जर त्यांनी विचारणा केली असती, तर मी त्यांना एअरक्राफ्ट दिले असते. कसेही करून दिले असते. फक्त पाच एअरक्राफ्टची गरज होती", असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. तसेच पुलवामा हल्ला झाला, त्या दिवशी पंतप्रधान मोदींशी झालेल्या संवादाबाबत सत्यपाल मलिक यांनी गंभीर आरोप केला आहे. मी त्याच संध्याकाळी पंतप्रधानांना सांगितले की पुलवामा आपल्या चुकीमुळे घडले आहे. आपण जर त्यांना एअरक्राफ्ट दिले असते, तर हे घडले नसते. तर त्यांनी मला सांगितले की तुम्ही आत्ता शांत राहा, असा दावा सत्यपाल मलिक यांनी केला आहे.

टॅग्स :संजय राऊतनरेंद्र मोदीभाजपा