मुंबई : काँग्रेसने सत्तर वर्षात काय केले, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी विचारत असतात. या देशात पेट्रोल ७० रुपये लिटर व्हायला सत्तर वर्षे लागली. मोदींनी मात्र सात वर्षातच पेट्रोलचे दर १०७ रुपये प्रति लिटरवर नेले, यावर भाजप नेत्यांकडे काय उत्तर आहे, असा प्रश्न मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे. काँग्रेसचे आंदोलन ही गरिबांची लढाई आहे. यात किती अपघात झाले, अडचणी आल्या तरी संघर्ष करत राहू, असा निर्धारही जगताप यांनी व्यक्त केला.
पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस दरवाढी विरोधात आणि वाढत्या महागाई विरोधात मुंबई काँग्रेसने ७ जुलैपासून आंदोलन निषेध छेडलेले आहे.
त्याचाच भाग म्हणून उत्तर मुंबई युवक काँग्रेसतर्फे आज मुंबईमध्ये इंद्रप्रस्थ मॉल, बोरिवली पश्चिम ते एन एल कॉलेज मालाड पश्चिम भव्य सायकल रॅलीचे आंदोलन करण्यात आले होते. या रॅलीदरम्यान भाई जगताप म्हणाले की, भाजपचे नेते गरिबांच्या समस्यांबद्दल काहीही बोलत नाहीत. अदानी व अंबानी या आपल्या दोन श्रीमंत मित्रांना सांभाळणे हेच काम मोदी सरकार आजपर्यंत करत आलेले आहे. पण आमचे आंदोलन ही गरिबांची लढाई आहे. या लढाईत कितीही अडचणी आल्या, कितीही अपघात झाले तरी ते आम्हाला चालेल, पण गरिबांचा हा लढा लढत राहणार व गरिबांचा आवाज मोदी सरकारपर्यंत पोहचविण्याचे काम करत राहणार. मोदी सरकारने ७ वर्षांमध्ये पेट्रोलवरचा अबकारी कर ३२ रुपयांनी वाढविला. तो २० रुपयांनी जरी कमी केला, तरी जनतेला थोडासा दिलासा मिळेल. पण गरिबाला दिलासा देण्याची यांची भूमिकाच नाही, अशी टीका भाई जगताप यांनी केली.
या सायकल रॅलीमध्ये भाई जगताप व चरणसिंग सप्रा यांच्या समवेत मुंबई काँग्रेसचे सर्व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.