Join us  

'मोदी काशीतच रमले, संसद सुरू होऊन 14 दिवस झाले तरी ते फिरकलेच नाहीत'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 9:01 AM

आपले पंतप्रधान मोदी यांना गंगेने साद घातली म्हणून ते काशीला गेले व तेथेच रमले; पण संसद सुरू होऊन 14 दिवस झाले तरी ते संसदेत फिरकले नाहीत.

नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन आता जवळपास 15 दिवस होत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अद्यापही ससंदेत हजेरी लावली नाही, यावरुन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केलं आहे. तसेच, राज्यसभेच्या 12 खासदारांचे निलंबन हे संविधानाच्या कुठल्याही कलमान बसत नसल्याची आठवणही त्यांनी करून दिली. गेल्या 15 दिवसांपासून हे खासदार महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ बसून आहेत, पण देशाच्या उपराष्ट्रपतींनी त्यांची साधी दखलही घेतली नसल्याचकडेही राऊतांनी लक्ष्य वेधले. 

आपले पंतप्रधान मोदी यांना गंगेने साद घातली म्हणून ते काशीला गेले व तेथेच रमले; पण संसद सुरू होऊन 14 दिवस झाले तरी ते संसदेत फिरकले नाहीत. याचे कारण म्हणजे संसदेत आज सक्षम विरोधी पक्ष नाही. केंद्र सरकारला विरोधकांचे भय सोडाच, पण आदरही नाही. गुलाब नबी आझाद हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवृत्त झाले तेव्हा पंतप्रधान मोदी व्याकूळ झाले व रडले; पण त्यांच्या जागी आलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांचे ऐकायचे नाही ही सरकारची भूमिका नको तितक्या हटवादीपणाची आहे. हा वैचारिक क्षुद्रपणा आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी मोदींविरुद्ध रोखठोक भूमिका मांडली आहे. 

वडिलांच्या मंत्रीपदाचा तोरा दाखवून चिरडले

पंतप्रधान मोदी कालपर्यंत ज्या मूल्यांचा ते स्वतः उद्घोष करीत होते तीच त्यांनी पायदळी तुडवली आहेत. लोकसभेत अजय मिश्रा टेनी या गृहराज्यमंत्र्याचा राजीनामा मागण्यासाठी विरोधक वेलमध्ये उतरले. लखीमपूर खेरीत ज्या शेतकऱ्यांवर गाडी चढवली व मारले तो 'गाडीवान' मंत्री अजय टेनी यांचा मुलगा. या घटनेच्या चौकशीसाठी 'एस.आय.टी.' नेमली. त्यांनी आता अहवाल दिला, लखीमपूरची घटना म्हणजे ठरवून केलेले षड्यंत्र होते. वडिलांच्या मंत्रीपदाचा तोरा दाखवून त्याने शेतकऱ्यांना चिरडले. त्यासाठी विरोधकांनी मंत्र्यांचा राजीनामा मागितला तेव्हा सभागृहात पंतप्रधान, गृहमंत्री उत्तर द्यायला हजर नाहीत, असेही राऊत यांनी सांगितले.  

काँग्रेस अन् विपक्ष काय करत आहे?

प्रियंका गांधी यांनी लखीमपूर खेरीत त्या मध्यरात्री धाव घेतली नसती तर इतर सर्व प्रकरणांप्रमाणे हे प्रकरणही सरकारने दडपून टाकले असते; पण प्रियंका व राहुल गांधींनी ही लढाई शेवटपर्यंत नेलीच. अर्थात, सरकारच्या मुठीतील मीडियाने या विजयाचे पूर्ण श्रेय प्रियंका आणि राहुल गांधींना दिले नाही. राहुल गांधी यांचे म्हणणे असे की, 'मोदी किंवा शहा हे फक्त मुखवटेच आहेत. देश आणि सत्ता नियंत्रित करणारे उद्योगपती आहेत. देशाचा मीडियाही त्याच शक्ती नियंत्रित करीत आहे.' गांधी यांचे म्हणणे खरे मानले तरी या अज्ञात आणि अनियंत्रित शक्तींवर प्रहार करण्यासाठी काँग्रेस आणि विरोधी पक्ष काय करीत आहे? 

टॅग्स :नरेंद्र मोदीशिवसेनासंजय राऊतवाराणसी