'मोदी है तो मुमकिन है', उद्धव ठाकरेंचा काश्मिरी डाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 07:48 AM2019-05-04T07:48:44+5:302019-05-04T07:49:07+5:30
जन्मानं काश्मिरी पंडित असलेल्या आणि तब्बल 29 वर्षांनंतर काश्मीरमध्ये पुन्हा परतलेल्या रोशनलाल यांचं शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी स्वागत करून त्याचं श्रेय मोदींना दिलं आहे.
मुंबईः जन्मानं काश्मिरी पंडित असलेल्या आणि तब्बल 29 वर्षांनंतर काश्मीरमध्ये पुन्हा परतलेल्या रोशनलाल यांचं शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी स्वागत करून त्याचं श्रेय मोदींना दिलं आहे. मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले, त्याप्रमाणे रोशनलाल यांनी कश्मीरच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवले. आता एक पाऊलवाट तयार होईल. काश्मिरात गुलाबाचे ताटवे पुन्हा फुलतील. ‘हिंदुस्थान झिंदाबाद’चे नारे घुमतील. मोदी यांनी देशाच्या धमन्यांत जे स्फुल्लिंग चेतवले त्याचेच हे दृष्य, फळ दिसू लागले आहे. मोदी है तो सबकुछ मुमकीन हैं। रोशनलाल यांच्या कश्मीर प्रवेशाने ते पुन्हा सिद्ध झाले, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सामन्याच्या अग्रलेखातून मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत.
सामनाच्या अग्रलेखातील ठळक मुद्दे-
- कश्मीर खोर्यांत एकही हिंदू राहता कामा नये व कुणी राहिलाच तर त्यास खतम करायचे ही पाकिस्तानची योजना होती. त्यातूनच असंख्य पंडितांचे शिरकाण करण्यात आले.
- उरलेल्यांना तिथून विस्थापित होण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यातील एक रोशनलाल 29 वर्षांनंतर कश्मीरमध्ये परतले. मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले त्याप्रमाणे रोशनलाल यांनी कश्मीरच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवले.
- मोदी यांच्यामुळे देशात चांगल्या गोष्टी घडू लागल्या आहेत व रोजच काही ना काही चांगले घडून देशात आनंदाचे क्षण येऊ लागले आहेत.
- तब्बल 29 वर्षांनंतर 74 वर्षांचे रोशनलाल हे काश्मिरी पंडित श्रीनगरात परतले आहेत. याचे श्रेय पंतप्रधान मोदी यांनाच द्यावे लागेल.
- काश्मिरी पंडितांची घरवापसी होईल व पंडित सुरक्षितपणे आपापले उद्योग, व्यवसाय पुन्हा सुरू करतील हीच मोदी यांची इच्छा होती व त्या इच्छेनुसार रोशनलाल यांनी पुन्हा काश्मीरमध्ये पाऊल टाकले आहे.
- रोशनलाल या काश्मिरी पंडिताची जीवन कहाणी रोमांचक तितकीच संवेदनशील आहे. श्रीनगरात ते एक दुकान चालवीत असत.
- ऑक्टोबर 1990 मध्ये अज्ञात अतिरेक्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर कश्मीर सोडून ते जुन्या दिल्लीत आले व फळविक्रीचा व्यवसाय करू लागले;
- आता तब्बल 29 वर्षांनी ते पुन्हा कश्मीरात परतले आहेत व आपला जुना व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे. रोशनलाल यांचे मित्र, शेजारी मंडळींनी त्यांचे स्वागत केले व अनेकांना आनंदाचे अश्रू आवरले नाहीत.
- रोशनलाल यांनी गेल्या 29 वर्षांत दिल्लीत चांगलाच जम बसवला होता. स्वतःचे घर, व्यवसाय दिल्लीत बहरला असतानाच त्यांचे मन स्वतःच्या भूमीकडे म्हणजे कश्मीरकडे ओढ घेत होते व शेवटी ते काश्मिरात परतलेच.
- रमजानचा महिना सुरू आहे. त्यामुळे ड्रायफ्रूट व खजुराचा व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे. त्यांच्या दुकानातून माल विकत घेण्यासाठी मुसलमान बांधवांनी गर्दी केली आहे.
- मोदी यांनी हिंमत दिल्यामुळेच रोशनलाल यांना कश्मीरात पुन्हा यावे असे वाटले व रोशनलाल यांच्या पावलावर पाऊल ठेवत हजारो काश्मिरी पंडित घरवापसी करतील याविषयी आमच्या मनात शंका नाही.
- काश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे व त्यासाठी सैन्य, नागरिक, राजकीय नेते यांनी बलिदान दिले आहे. दहशतवाद्यांनी पंडितांना मारले व उरलेल्यांना बंदुकीच्या धाकाने पळवून लावले. त्यामुळे आपल्याच देशात निर्वासित होण्याची वेळ काश्मिरी पंडितांवर आली.
- त्या पंडितांची घरवापसी व्हावी यासाठी काँग्रेस राजवटीत काहीच प्रयत्न झाले नाहीत, पण मोदी यांच्यामुळे कश्मीरात विकासही होत आहे, रोजगार निर्माण होत आहे.
- दहशतवाद्यांचा खात्मा होत आहे व फुटीरतावाद्यांच्या मुसक्या आवळून कश्मीरातील भय दूर केले जात आहे. मोदी यांना हे श्रेय द्यावेच लागेल.
- गेल्या काही दिवसांत जैश-ए-मोहम्मदचे कंबरडे कश्मीरात मोडून काढले व त्यांचा म्होरक्या मसूद अझरला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत जागतिक आतंकवादी म्हणून घोषित करून मोदी यांनी पाकिस्तानला उलटे टांगून मारले.
- त्याचा परिणाम असा झाला की, खोर्यातील भीतीचे वातावरण निवळले. त्याचाच परिणाम म्हणून रोशनलाल यांच्यासारखे ‘पंडित’ पुन्हा कश्मीरात परतू लागले आहेत.
- आज एक रोशनलाल आले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून उद्या हजारो किसनलाल, मोहनलाल, रामलाल आणि नंदलाल खोर्यात येतील व नंदनवन पुन्हा सुखासमाधानाने बहरू लागेल.
- काश्मीर ही आपल्या देशाची वाहती जखम आहे. हिंदुस्थान व पाकिस्तान यांच्यातील तणावाचे एक मुख्य कारण कश्मीर हे आहे.
- ‘काश्मीरमध्ये मुसलमानांचे बहुमत आहे, तो प्रदेश पाकिस्तानशी संलग्न आहे आणि तेथील बहुसंख्य मुसलमान पाकिस्तानात सामील होऊ इच्छितात. त्यामुळे तो प्रदेश आपल्याला मिळाला पाहिजे,’ असा पाकिस्तानचा दावा आहे.
- त्या मूर्खांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेचच कश्मीरवर हल्ला केला होता. पाकिस्तानने पठाणांच्या लुटारू टोळ्या तिथे पाठवल्या होत्या; पण त्याचा उपयोग झाला नाही आणि जम्मू-कश्मीर हिंदुस्थानचाच भाग बनून राहिला.
- आपल्या राज्यघटनेप्रमाणे कश्मीर हे हिंदुस्थानचे इतर राज्यांप्रमाणेच एक अविभाज्य अंग आहे व त्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड हिंदुस्थानला मान्य नाही.
- पाकिस्तानने दहशतवादी टोळ्यांना ताकद देऊन काश्मीरात हिंसाचार घडवण्यास सुरुवात केली. कश्मीर खोर्यांत एकही हिंदू राहता कामा नये व कुणी राहिलाच तर त्यास खतम करायचे ही पाकिस्तानची योजना होती.
- असंख्य पंडितांचे शिरकाण करण्यात आले. उरलेल्यांना तिथून विस्थापित होण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यातील एक रोशनलाल आता तब्बल 29 वर्षांनंतर कश्मीरमध्ये परतले आहेत.
- मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले त्याप्रमाणे रोशनलाल यांनी कश्मीरच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवले. आता एक पाऊलवाट तयार होईल. काश्मीरात गुलाबाचे ताटवे पुन्हा फुलतील.