पवार कुटुंबाची चिंता मोदींनी करू नये, दुष्काळ, शेतकरी आत्महत्यांवर बोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 06:06 AM2019-04-03T06:06:38+5:302019-04-03T06:14:27+5:30

शरद पवार यांचा पलटवार; दुष्काळ, शेतकरी आत्महत्यांवर बोला

Modi should not be worried about Pawar's family, talk about drought, farmer suicides | पवार कुटुंबाची चिंता मोदींनी करू नये, दुष्काळ, शेतकरी आत्महत्यांवर बोला

पवार कुटुंबाची चिंता मोदींनी करू नये, दुष्काळ, शेतकरी आत्महत्यांवर बोला

Next

कोल्हापूर : आमची आई कोल्हापूरची असून ती शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारात वाढली आहे. त्याच संस्कारांमध्ये आमची जडणघडण झाली असल्याने पंतप्रधान मोदी यांनी पवार कुटुंबीयांची चिंता करू नये, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी दिले. आमच्या कुटुंबावर बोलण्याऐवजी मोदींनी दुष्काळ, शेतकरी आत्महत्येवर बोलावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक व राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. वर्धा येथे झालेल्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी पवार कुटुंबात कलह सुरू असून पुतणे अजित पवार पक्षावर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते. तो संदर्भ घेऊन पवार म्हणाले, पंतप्रधान विदर्भात दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, विकासाच्या मुद्द्यावर काहीतरी बोलतील असे वाटले होते. परंतु त्यांनी पवार कुटुंबीयांवरच हल्ला केला. अजित पवार हे उत्तम प्रशासक आहेत. राज्य कसे चालवायचे याची त्यांना जाण आहे. माझी आई कोल्हापूरची कन्या आहे. पंचगंगा नदीच्या पाण्यावर ज्यांची जडणघडण होते, त्यांचा संस्कारामध्ये हात कुणी धरू शकत नाही. अशा संस्कारांतून आलेल्या कुटुंबाकडून कायम व्यापक हिताचीच जपणूक झाली आहे. त्यामुळे मोदी यांनी माझ्या कुटुंबाची चिंता करू नये.’
मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास राज्यघटनेमध्ये बदल करून एक मताचा अधिकार उद्ध्वस्त करतील अशी भीती व्यक्त करून पवार यांनी गांधी घराण्याच्या त्यागाचे व राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचेही तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले की ‘मोदी सत्तेत आल्यापासून सातत्याने गांधी परिवारावर व्यक्तिद्वेषातून हल्ले करत आहेत. ज्या जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यासाठी आयुष्यातील उमेदीची १३ वर्षे तुरुंगात काढली, देशाच्या एकात्मतेसाठी इंदिरा व राजीव गांधी यांनी बलिदान दिले, त्या घराण्याच्या त्यागाची किंमत तुम्हाला नाही कळली तरी ती देशाला माहीत आहे.


राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी या देश सोडून जातील असे अनेकांना वाटले होते. परंतु त्यांच्यावरही गांधी घराण्याचे त्यागाचे संस्कार झाले असल्याने त्यांनी तसे केले नाही.आज राहुल गांधी हे नव्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून देशभर फिरत आहेत व त्यांना जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे गौरवोद्गारही पवार यांनी काढले.

अन्य धर्मीयांचे योगदान नाकारणे अयोग्य
गांधीजींच्या कर्मभूमीत जाऊन मोदी यांनी हिंदू हिंदू असा जप केला. हिंदूंच्या हिताची जपणूक करणे यामध्ये गैर कांही नाही. परंतु ते करताना मुस्लीम, नवबौद्ध किंवा ख्रिश्चन समाजाचे देशाच्या उभारणीतील योगदान तुम्ही नाकारत आहात. देशाचा प्रमुख सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची शपथ घेतो; परंतु तुम्ही तर अन्य धर्मीयांबद्दल द्वेषाची भावना वाढीस लागेल अशी वक्तव्ये करत आहात. हा तर घटनेशी द्रोहच असून अशा लोकांच्या हातातील सत्ता हिसकावून घेण्याची वेळ आली असल्याचे पवार यांनी सांगितले.

Web Title: Modi should not be worried about Pawar's family, talk about drought, farmer suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.