मोदी सरकारच्या कारभाराविरोधात राज्यभर काँग्रेसची निदर्शने
जनतेला कोरोनाच्या खाईत लोटणाऱ्या मोदींनी राजीनामा द्यावा
नाना पटोले; मोदी सरकारच्या कारभाराविरोधात राज्यभर काँग्रेसची निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सात वर्षांत सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेचे खापर तबलिगीच्या नावावर फोडून धार्मिक रंग देण्याचा उद्योग केला, तर दुसऱ्या लाटेच्या वेळी मोदी सरकार विधानसभेच्या प्रचारात दंग होते. आपल्या मनमानी कारभाराने देशातील १३० कोटी जनतेला कोरोनाच्या खाईत लोटणाऱ्या नरेंद्र मोदींना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. नैतिक मुद्दयावरून मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी केली.
मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने आज जिल्हा-तालुका स्तरावर काळ्या फिती लावून निदर्शने केली, तसेच मोदी सरकारचा निषेध केला. मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, चरणसिंग सप्रा यांच्यासह नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पटोले म्हणाले की, या सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेल सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. कोरोना महामारीत तर मोदी सरकारने अत्यंत बेजबाबदारपणा केला. लसीचे नियोजन केले असते, तर आज लसीसाठी लोकांना रांगा लावाव्या लागल्या नसत्या. हे सरकार फक्त पैसेवाल्यांचे पंचतारांकित सरकार आहे हे सिद्ध झाले आहे. कोरोना लसीसाठी श्रीमंतांना पंचतारांकित ट्रीटमेंट दिली जात आहे आणि दुसरीकडे गरिबांना मात्र लसीसाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. सामान्य जनतेला रांगेत उभे करणे हेच मोदींचे धोरण आहे, अशी टीका पटोले यांनी केली.
तर, मोदी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आज जनतेला लसीसाठी तडफडावे लागत असल्याची टीका भाई जगताप यांनी केली. मोदी सरकार विरोधकांचा आवाज दडपण्याचे काम करत आहे; परंतु घटनेने आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला आहे. आम्ही प्रश्न विचारत राहू, लोकांच्या प्रश्नांसाठी पुन्हा रस्त्यावर उतरू. मोदी सरकारने देशाचे कसे वाटोळे केले हे जनतेसमोर उघड करण्याचे काम आम्ही केल्याचे जगताप म्हणाले.
आज राज्यभर काँग्रेसने काळा दिवस पाळून मोदी सरकारचा निषेध केला, तसेच प्रत्येक विभागात काँग्रेसच्या वरिष्ठ नेते व मंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल केली. पुणे येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नाशिकमध्ये विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, औरंगाबाद येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नागपूरमध्ये ऊर्जामंत्री नितीन राऊत, अमरावती येथे मंत्री विजय वडेट्टीवार, लातूरमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, कोल्हापूरमध्ये गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या काळ्या कारभाराची पोलखोल केली.
....................................