मुंबई - जगभरात कोरोना रोगाच्या वृत्ताने थैमान घातले आहे. जिकडे तिकडे कोरोनाचीच चर्चा आणि त्यांसंदर्भात जनजागृती व उपाय करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. चीनमधून सुरुवात झालेला हा रोग महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये, अनेक संस्थांना 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, पर्यटनांच्या ठिकाणांनाही टाळे लागले आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींना लक्ष्य केलंय.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन कोरोनाची दाहकता सांगताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात अनेकदा माजी पंतप्रधान आणि दिवंगत नेते पंडित जवाहरलाल नेहरूंचा उल्लेख केला जातो. तसेच, देशातील अनेक घटनांना नेहरूच जबाबदार असल्याचे म्हटले जाते. त्याच, पार्श्वभूमीवर नेहरूंना उद्देशून मोदींवर काँग्रेस समर्थकांकडून टीका करण्यात येते. सोशल मीडियावर सातत्याने हा ट्रेंड पाहायला मिळतो. आता, जितेंद्र आव्हाड यांनी एक उपहासात्मक ट्विट केले आहे.
अशा आशयाचे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. सध्या देशभरातील मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला असून पर्यटनस्थळांनाीह कुलूप लावण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये सरदार वल्लभाई पटेल यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा असलेलं पर्यटनस्थळही बंद करण्यात आलंय. त्यावरुनच, आव्हाड यांनी मोदींना लक्ष्य केलंय. आज नेहरूंनी बांधलेली रुग्णालये 24 तास खुली असून देशातील जनतेची सेवा करत आहेत, असे आव्हाड यांनी म्हटलंय.
दरम्यान, जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या गुरुवारी (19 मार्च) 2,20,827 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे 170 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृतांची संख्या 8,900 वर पोहोचली आहे. दुसरीकडे 85,121 लोक बरेही झाले आहेत. आशियाई देशांपेक्षा युरोपमध्ये मृत्यूंची संख्या जास्त आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे भारतात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 171 पर्यंत पोहोचली आहे.