मोदींनी आम्हाला 'फकिरी' शिकवली, पवारांना टोला लगावताना मुख्यमंत्र्यांची 'शायरी'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 08:43 AM2019-09-20T08:43:17+5:302019-09-20T08:50:48+5:30
नरेंद्र मोदींनी माझी आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रशंसा केली.
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. मोदींनी नाशिक येथील महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी केलेल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांचे तोंड भरुन कौतुक केले होते. तसेच, महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि ऊर्जावान मुख्यमंत्री अशी विशेषणही मोदींनी फडणवीसांबाबत लावली होती. याबाबत फडणवीस यांनी माझ्या महाजनादेश यात्रेच्या प्रतिसादाचे श्रेय मोदींचे आहे, असे म्हणत त्यांचे आभार मानले. तसेच, पवारांच्या खोचक टीपण्णीला फडणवीस यांनी शायरीतून उत्तर दिले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'महाजनादेश यात्रा' करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यात्रेचा समारोप करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतचा एक 'हिशेब' चुकता केला. नाशिकमधील या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. त्यांच्यासमोरच मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या टिप्पणीला प्रत्युत्तर दिलं. ''हिशेब देणं ही चांगली गोष्ट आहे. पूर्वीच्या काळात आमच्या घरात खतावणी लिहिणारे असायचे, असं त्यांनी खोचकपणे म्हटलं होतं. त्यावर, तुमची मानसिकताच राजेशाही आहे आणि म्हणूनच लोकांनी तुम्हाला घरी बसवलं, असं टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. आम्ही जनतेचे सेवक आहोत आणि हिशेब देणं हे सेवकाचं काम असतं, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. त्यानंतर, आपल्या फेसबुक अकाऊंटवरुनही मोदींनी आम्हाला फकिरी शिकवल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय.
नरेंद्र मोदींनी माझी आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रशंसा केली. त्यांनी केलेल्या या प्रशंसेचा मी अतिशय विनम्रपणे स्वीकार करतो. पंतप्रधानांचे मी मन:पूर्वक आभारही मानतो, जेव्हा-केव्हा महाराष्ट्राला मदतीची गरज होती, तेव्हा त्यांनी ती तातडीने आणि सढळपणे दिली. पंतप्रधान आणि महाराष्ट्रातील जनतेने जी जबाबदारी माझ्यावर सोपविली, ती पारदर्शी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न आपण केला, त्याचा परिणाम या महाजनादेश यात्रेला मिळालेला प्रतिसाद आहे. महाजनादेश यात्रा हा प्रवास होता ग्रामराज्य (गुरूकुंज मोझरी) ते रामराज्य (नाशिक) यामधला. लोकांच्या चेहर्यावर आत्मविश्वासाचे भाव आपण पाहिले. पण, याचे श्रेय पंतप्रधान मोदींना जाते. या यात्रेचा प्रवास दुष्काळी भागातून पुराच्या प्रदेशापर्यंत झाला. महाराष्ट्रातील जनता किती संवेदनशील आहे, की यात्रेदरम्यान माझ्याकडे त्यांनी सुमारे साडेतीन कोटींचे धनादेश आणून दिले. महिलांच्या चेहर्यावर आगळेच समाधान होते, ते उज्वलाची यशोगाथा सांगत होते. मला असे वाटते की आपल्या राजाला हिशेब देणे, हे सेवकाचे कामच आहे. जबाबदारीपेक्षा ते सर्वोच्च कर्तव्य अधिक आहे. कारण, मोदींनी कायम आम्हाला हे शिकविले की,
जमीर जिंदा रखो
कबीर जिंदा रखो
बादशाह भी बनजाये तो
दिल में फकीर जिंदा रखो...!
असे शायरी फडणवीस यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरन लिहिली असून पवारांना या शायरीतून टोला लगावला आहे.