Join us

'प्रियंका अन् कंगनाला भेट देणाऱ्या मोदींना संभाजीराजेंना भेटायला वेळ नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 10:34 AM

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले.

ठळक मुद्देमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले.

मुंबई - खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षणाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या अलिप्त भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली होती. नरेंद्र मोदींना मी चारवेळा पत्रव्यवहार केला, पण अद्यापही मला भेट मिळाली नाही, असे संभाजीराजेंनी जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन, काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही मोदींच्या या भूमिकेवरुन प्रश्न विचारला आहे. 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी मोदींविरुद्ध उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. संभाजीराजेंना अद्यापही मोदींची भेट न मिळाल्याने मराठा समाजातील संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करुन मोदींवर निशाणा साधलाय. 

सावंत यांनी चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पुण्यात दिलेल्या स्पष्टीकरणावर हा प्रश्न विचारला आहे. ''महाराष्ट्रातील बॉलिवूडबद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण, मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही हे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढून इतिहास रचणा-या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे. चंद्रकांत दादा, प्रियांका चोप्रा व कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींना छत्रपती संभाजी राजेंना भेटायला वेळ नाही. राजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहत होते. या अभिनेत्री‌ कोणते प्रश्न घेऊन भेटल्या? कोणास भेटावे हा आक्षेप नाही. संभाजीराजेंना भेट न देणे हा महाराष्ट्राचा अवमान आहे,'' असे ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे. सावंत यांनी कंगनासोबत भेटीचा फोटोही ट्विटरवरुन शेअर केला आहे. 

भेटीबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले

मराठा आरक्षण हा राज्याचा सूचीमधील विषय आहे. त्यासाठी संभाजीराजेंनी मोदींची भेट मागितली असेल. पण त्यात केंद्राची काहीच भूमिका नाही. म्हणूनच भेटून उपयोग होणार नाही. असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. संभाजीराजेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अद्याप भेट का दिली नाही, या प्रश्नावर भाजपा प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिलंय.  

टॅग्स :संभाजी राजे छत्रपतीचंद्रकांत पाटीलनरेंद्र मोदीसचिन सावंत