मुंबई - राज्यभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यात दहीहंडीचा मोठा जल्लोष असतो. राजकीय नेते आणि सेलिब्रिटींची वर्दळ येथील दहीहंडी सोहळ्यात दिसून येते. राज्याचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे ठाण्याचे रहिवाशी असल्याने दहीहंडी उत्सावाला त्यांनी ठाण्यासह, मुंबई आणि विविध ठिकाणी उपस्थिती लावत गोविंदा आणि कार्यकर्त्यांसोबत दहीहंडी उत्सवात उत्साह भरला. यावेळी, मुख्यमंत्र्यांनाही सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.
देशात आगामी लोकसभा निवडणुकींचे वारे वाहू लागले असून भाजपने त्यासाठीची तयारीही सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठीचा चंग बांधला आहे. तर मोदींच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येत त्यांनी इंडिया आघाडीची स्थापन केली आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात राष्ट्रवादीतील अजित पवार गटाला सोबत घेऊन शिवेसना आणि राष्ट्रवादीसोबत भाजपने महायुती केली आहे. आता, महायुतीतील दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते २०२४ साली मोदींनाच पंतप्रधान करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना आणि विविध कार्यक्रमांमध्ये करत आहेत.
मुख्यमंत्रीएकनाथ शिंदेंनी घाटकोपर येथे आमदार राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली. यावेळी, भाषण करताना २०२४ साली मोदींना पंतप्रधान करायचं आहे. २०२४ ची राजकीय दहीहंडी मोदीच फोडणार असल्याचं म्हटलं. मोदींच्या नेतृत्त्वात देश प्रगती करत आहे, ही विकासाची आणि प्रगतीची दहीहंडी आहे. दहीहंडीच्या मुहूर्तावर पाऊसही पडत आहे, आपल्यासह बळीराजाला दिलासा देणारी ही बाब असल्याचंही मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटले.
दहीहंडी उत्सवात १३ गोविंदा जखमी
ठाणे शहरात गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत १३ गोविंदा जखमी झाले आहेत. यामध्ये ९ गोंविदांना कळवा रुग्णालयात तर चार गोविंदांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. यामध्ये एका महिला गोंविदाचा समावेश असून त्या महिला गोविंदाच्या मणक्याला दुखापत झाल्याने, नातेवाईकांनी तातडीने मुंबईच्या खासगी रुग्णालयात हलविले आहे. तर एक गोविंदाचा हात फॅक्चर झाला असून उर्वरित सर्व जण किरकोळ जखमी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्या सर्वांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.