मरीन ड्राइव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
मुख्यमंत्र्यांनी सही केलेल्या फाईलमध्ये फेरफार
मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या एका महत्त्वाच्या फाईलमध्ये फेरफार करत त्यांचा आदेश फिरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे मंत्रालयात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधील बांधकामात झालेल्या अनियमिततेबाबत सुरू असलेल्या चौकशीच्या फाईलमध्ये ही फेरफार करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही फाईल उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवली होती. मुख्यमंत्र्यांनी सही केल्यानंतर ही फाईल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे परत आली. मुख्यमंत्र्यांना चौकशी करण्याचा प्रस्ताव पाठवलेला असताना फाईलवर मात्र चौकशी बंद करण्याचा आदेश दिला होता. यात मुख्यमंत्र्यांनी इतर अभियंत्यांच्या चौकशीचे आदेश कायम राखत फक्त त्यावेळी कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असलेल्या नाना पवार यांचे नाव वगळले होते. त्यामुुळे त्यांना संशय आला. त्यांनी ही फाईल पुन्हा मंत्रालयात पाठवली. त्यावेळी फाईलची मूळ प्रत तपासल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सहीच्या वरच्या भागात असा कोणताही शेरा मुख्यमंत्र्यांनी लिहिला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यामुळे कोणी तरी त्यांच्या स्वाक्षरीच्या वरच्या भागात लाल शाईने एक अतिरिक्त मजकूर लिहून त्यामध्ये चक्क त्या अभियंत्याची चौकशी बंद करावी, असा शेरा लिहिल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्याच्या वृत्ताला मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ कोळेकर यांनी दुजोरा दिला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.