Join us

मोदीजी, आम्हालाही 'एअरलिफ्ट' करा; वुहानमध्ये अडकलेल्या मराठमोळ्या तरुणीची साद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 5:15 PM

भारत सरकारच्या इंडिया इन चायना या ट्विटर हँडलवरुनही हुबेई आणि चीनमधील भारतीय

बिंजींग : भारत सरकारने चीनमध्ये अडकलेल्या 650 भारतीयांना मायदेशी सुखरुप पोहोचवले आहे. मात्र, अद्यापही चीनमधील काही महत्वाच्या शहरांमध्ये भारतीय नागरिक फसले असून घरवापसी करण्याची विनंती या भारतीयांकडून होत आहे. त्यातच, मराठमोळ्या अश्विनी पाटील यांनी भारत सरकारकडे एअरलिफ्ट करण्याची विनंती केली आहे. अद्यापही 60 ते 70 जण वुहान या शहरात अडकल्याची माहिती पाटील यांनी दिली.

भारत सरकारच्या इंडिया इन चायना या ट्विटर हँडलवरुनही हुबेई आणि चीनमधील भारतीय नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधत आहोत. पण, तत्पूर्वी आपणही प्रकृतीची काळजी घ्यावी आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचं अनुकरण करावे, असे आवाहन भारत सरकारने चीनमधील भारतीय नागरिकांना केलंय. भारत सरकारच्या या ट्विटर हँडलवर मराठमोळ्या अश्विनी पाटील यांनी कमेंट करुन आपली व्यथा मांडली आहे. 

माझ्यासह अनेक भारतीय नागरिक वुहान आणि जवळील शहरांमध्ये आहोत. त्यामुळे, कृपया आमच्याशी संपर्क साधून आम्हाला येथून मायदेशी वा सुरक्षितस्थळी घेऊन जावे, अशी विनवणी पाटील यांनी केली आहे. पाटील यांच्यासह 60 ते 70 भारतीय नागरिक वुहानमध्ये अडकले असून त्यांचा जीव धोक्यात आहे. भारत सरकारने आत्तापर्यत 2 विमाने पाठवून जवळपास 700 भारतीयांना चीनमधून भारतात आणले आहे. तसेच, आम्हालाही एअरलिफ्ट करून आमची कोरोनाग्रस्त भागातून सुटका करावी, अशी भावनिक साद पाटील यांनी घातलीय.    दरम्यान, चीनमधील हुआन शहरापासून 90 किलोमीटर अंतरावर सियानिग गावात हुबई विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ असून तेथे भारतातील 27 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हे सर्व विद्यार्थी भारतात लवकरच परतणार असून तेथील भारतीय दूतावासाशी महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी संवाद साधला. तसेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहनही केले होते. 

टॅग्स :चीनकोरोनाएअर इंडियानरेंद्र मोदीमराठी