Saugat E Modi Kit News: केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने देशातील अल्पसंख्याक समुदायासाठी नवीन अभियान सुरू केले आहे. या अभियानाचे नाव सौगात ए मोदी आहे. या माध्यमातून अल्पसंख्याक समुदायातील लोकांना खाण्याच्या गोष्टी आणि कपडेही आहेत. या अभियानाची चर्चा होत असून, आता समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी याबद्दल भाष्य केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! अबू आझमी यांनी सौगात ए मोदी किटबद्दल बोलताना भाजपवर टीका केली. एकाही मुस्लीम व्यक्तीला मंत्री केलं नाही, तिकीट दिले नाही, ते आता मुस्लिमांना सौगात देत आहेत, अशा शब्दात आझमींनी भाजपवर निशाणा साधला आहे.
मोदींचं नाव घेत आझमी काय बोलले?
"ज्या लोकांनी आपल्या पक्षात एकाही मुसलमानाला मंत्री बनवले नाही. एकालाही तिकीट दिले नाही, ते आज मुस्लिमांना सौगात देत आहेत. मोदीजी, आम्हाला तुमच्याकडून फक्त इतकंच हवंय की, भारताचे संविधान जे हक्क देते, प्रत्येक जातीच्या आणि धर्माच्या व्यक्तीला ते अधिकार आम्हाला मिळावेत", असे अबू आझमी म्हणाले.
हेही वाचा >>"जे बोंबलत फिरत होते त्यांना आता..."; भाजपच्या 'सौगात-ए-मोदी' वरुन ठाकरेंची टीका
"आम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज नाही. नागपूरमध्ये मुलं मशिदीमधून निघतात आणि जो समोर दिसेल त्याला अटक केली जात आहे. जे लोक चुकीचे आहेत, त्यांना पकडा. ईदची सगळ्यात मोठी सौगात ही असती की, जे लोक गुन्हेगार नाहीत, पण तुरुंगात आहेत. त्यांना सोडण्याचे आदेश तुम्ही दिले असते, तर मी सौगात समजू शकलो असतो", अशी मागणी अबू आझमी यांनी केली.
सौगात ए मोदी हे अभियान अल्पसंख्याक समुदायात येणाऱ्या मुस्लीम, शीख आणि ख्रिश्चन धर्मियांसाठी आहे. गरजूंना या माध्यमातून काही खाण्याच्या वस्तू दिल्या जात आहेत. पण, मुस्लिम समुदायाशी पक्ष जोडला जावा, यासाठी भाजपकडून हे अभियान हाती घेण्यात आल्याचे राजकीय वर्तुळातून सांगितले जात आहे. पक्षाचे ३२ हजार पदाधिकारी, ३२ हजार मशिदींमधून ३२ लाख मुस्लिमांना सौगात ए मोदी किटचे वाटप करणार आहेत.