मुंबई : पावसाळ्यात अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करू नये, असा नियम असला तरी मे महिन्यातदेखील महापालिका प्रशासनाने कारवाई करू नये, म्हणून खुद्द पंतप्रधानांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आझाद मैदानात लाक्षणिक उपोषण केले. देशातील एकाही झोपडीवर मेपासून सप्टेंबर महिन्यापर्यंत कारवाई न करण्याचे आदेश केंद्र सरकारने द्यावे, अशी मागणी जशोदाबेन यांनी केली.उपोषणाला बसण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे जशोदाबेन यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. त्या म्हणाल्या की, पावसाच्या तोंडावर झोपड्यांवर कारवाई केल्याने या लोकांचे पावसाळ्यात अतोनात हाल होतात. केवळ एका महिन्यात पर्यायी जागा शोधणे कठीण असते. त्यामुळे त्यांची मुले रस्त्यावर येतात. रस्त्यावरील मुलांसाठी काम करणाऱ्या ‘गुड समरितन मिशन’ संस्थेमुळे या परिस्थितीची माहिती मिळाली. मी उपोषणाला बसले, तर प्रशासन या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देईल, असे संस्थेने सांगितले. त्यामुळे एक दिवसाचे उपोषण करत असल्याची माहिती जशोदाबेन यांनी दिली.त्यांच्यासोबत त्यांचा लहान भाऊ अशोक चिमणलाल मोदी आणि वहिनी जशोदाबेन अशोक मोदी हे दोघेही उपोषणाला बसले होते. गुजरातमध्ये किराणा व्यवसाय करताना सामाजिक कार्य करत असल्याचे अशोक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
झोपडीवासीयांसाठी मोदीपत्नीचे उपोषण
By admin | Published: February 13, 2016 3:59 AM