मोदींचा ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम बघितला? फोटोसह व्हिडीओ पाठवा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 05:45 AM2019-01-28T05:45:31+5:302019-01-28T05:45:54+5:30
विद्या प्राधिकरणाच्या शिक्षण विभागाला सूचना; अहवाल तासाभरात सादर करणे गरजेचे; शिक्षकांनी व्यक्त केली नाराजी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा भाग २’ या कार्यक्रमात सहभागी झालेल्या राज्यातील शाळांनी सहभागाचा पुरावा म्हणून ५ उच्च दर्जाचे फोटो किंवा कमाल ३ मिनिटांचा व्हिडीओ विद्या प्राधिकरणाला २९ जानेवारी दुपारी २ वाजेपर्यंत सादर करायचा आहे. पुढे जिल्हास्तर अहवालांचे एकत्रीकरण करून, राज्याचा एकत्रित अहवाल त्याच दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत पंतप्रधान कार्यालयाला संकेतस्थळावर पाठवायचा असल्याच्या सूचना राज्यातील शाळांना विद्या प्राधिकरणाने दिल्या आहेत. २९ जानेवारी, २०१९ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत पंतप्रधान मोदी या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.
‘परीक्षा पे चर्चा’अंतर्गत ९वी ते १२वीचे विद्यार्थी, त्यांचे शिक्षक व पालक यांच्या प्रातिनिधिक गटासोबत दिल्लीत पंतप्रधान मोदी संवाद साधतील. त्याचे प्रक्षेपण डीडी नॅशनल, डीडी न्यूज, डीडी इंडिया या वाहिन्यांवरून पूर्ण देशभर होईल. हा कार्यक्रम राज्यातील सर्व शाळांमधील सहावीच्या पुढील सर्व विद्यार्थ्यांना दाखविण्यासाठी आवश्यक सुविधा शाळांमध्ये उपलब्ध करून देण्याच्या सूचना विद्या प्राधिकरणाने राज्यातील शिक्षण संचालक, उपसंचालक, तसेच शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या सूचना देताना एक अर्जही पाठविला आहे. यामध्ये जिल्ह्याचे नाव, एकूण शाळांची संख्या, कार्यक्रम बघितलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, एकूण शाळा, पटावरील विद्यार्थी, हा कार्यक्रम टीव्ही, रेडिओवर, वेबसाइटवर कुठे बघितला किंवा ऐकला याची माहिती नमूद करावी लागेल.
प्रजासत्ताक दिन आणि लागून आलेला रविवार, यामुळे या अहवालाच्या तांत्रिक तयारीसाठी वेळ अपुरा पडणार असल्याचा सूर काही शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनांत आहे. जिल्ह्याचा अहवाल वेळेवर न मिळाल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, कार्यक्रम पाहिल्यावर काही तांत्रिक अडचण आली आणि अहवाल संकेतस्थळावर नियोजित वेळेत देता न आल्यास पर्यायी व्यवस्था काय, असा सवाल काही शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
सक्ती करण्याची गरज नाही
कार्यक्रमासंदर्भात सक्ती केली असली, तरी योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था शिक्षण विभागाने केली पाहिजे. कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी सक्ती करण्याची गरज नाही. माननीय पंतप्रधान साहेबांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक मार्ग आहेत. व्हिडीओ, वर्तमानपत्र, तसेच सोशल मीडियाद्वारे संदेश पोहोचविणे सहज शक्य आहे.
- उदय नरे, शिक्षक, हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल.