Join us

मोदींचा गोध्रा कलंक धुऊन निघालेला नाही

By admin | Published: December 29, 2015 12:55 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी या व्यक्तीशी माझे प्रचंड मतभेद असून गुजरातमधील गोध्राकांडातील मोदी हे माझ्या दृष्टीने कलंकित मोदी आहेत. गोध्राचा कलंक त्यांनी धुऊन काढला आहे, असे मला बिलकूल वाटत नाही,

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी या व्यक्तीशी माझे प्रचंड मतभेद असून गुजरातमधील गोध्राकांडातील मोदी हे माझ्या दृष्टीने कलंकित मोदी आहेत. गोध्राचा कलंक त्यांनी धुऊन काढला आहे, असे मला बिलकूल वाटत नाही, असे विधान ८९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सोमवारी केले. रविवारी याच सबनीस यांनी मोदींच्या पाक भेटीकरिता त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती.नरेंद्र मोदी या व्यक्तीचा नव्हे तर पंतप्रधानांच्या विवेकी राष्ट्रवादाचा मी रविवारी गौरव केला. मोदींशी आपले वैयक्तिक मतभेद असून गोध्राकांडात त्यांच्यावरील कलंक धुऊन निघालेला नाही, असे सबनीस म्हणाले. ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने सोमवारी जोशी सभागृहात सबनीस यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.राजकीय व्यक्तींनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर असावे का, असा सवाल केला असता ते म्हणाले की, राजकीय व्यक्ती ही संमेलनाच्या व्यासपीठावर आलीच पाहिजे. उलट, तिला सन्मानाने निमंत्रित केले पाहिजे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी बाजूबाजूला बसणार आहोत व त्यात काही गैर नाही.कधी मोदींचे समर्थन तर कधी टीका करणाऱ्या सबनीस यांना भविष्यात राजकारणात उतरणार का, असे विचारले असता ते म्हणाले की, मी साहित्याचा सेवक असल्याने शब्दांशी इमानदारी हे माझे कर्तव्य आहे. जीवनाच्या अंतापर्यंत ते तसेच राहील. राजकीय क्षेत्र माझ्यासाठी नसून राजकीय व्यवस्थेसाठी जो कोडगेपणा, काही प्रमाणात क्रौर्य व असंस्कृतपणा लागतो, ते सुदैवाने माझ्यात नाही. त्यामुळे या क्षेत्राकडे मी मुळीच वळणार नाही. याचा अर्थ राजकारणातली सर्वच माणसे असंस्कृत, कोडगी आहेत, असे नाही. परंतु, मी राजकारणासाठी योग्य माणूस नाही.यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्यांची परंपरा पूर्ण खंडित झाली, असे म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. राजकारण आणि राजकीय व्यक्तींना पूर्णपणे बहिष्कृत ठरवून कोणताही समाज, कोणतीही संस्कृती ही शिल्लक राहील किंवा विकसित, सुरक्षित राहील, असे नाही. विचारवंतांचा घोटाळा जसा समर्थनीय मानता येत नाही, तसा राजकीय व्यक्तींनी केलेला आर्थिक घोटाळा समर्थनीय मानता येत नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)