'मोदींचा गुजरात दौरा, फडणवीसांचा कोकण, CM साहेब तुम्ही मुंबई तरी करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 04:20 PM2021-05-19T16:20:56+5:302021-05-19T16:21:37+5:30

तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दोन्ही विरोधी पक्षनेते कोकण दौऱ्यावर आहेत. यावरून भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

'Modi's Gujarat tour, Fadnavis' Konkan, CM Saheb, do it in Mumbai', chitra wagh on taukte cyclone | 'मोदींचा गुजरात दौरा, फडणवीसांचा कोकण, CM साहेब तुम्ही मुंबई तरी करा'

'मोदींचा गुजरात दौरा, फडणवीसांचा कोकण, CM साहेब तुम्ही मुंबई तरी करा'

Next
ठळक मुद्देभाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटरवरुन त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलंय.  

मुंबई - महाराष्ट्रात आलेल्या तौक्ते Tauktae चक्रीवादळाने हाहाकार माजवला. या वादळामुळे महाराष्ट्रात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २८ जण या वादळाच्या तडाख्यात जखमी झाले आहेत. मुंबईत वादळामुळे दोघांचा मृत्यू झाला तर ९ जण जखमी झाले आहेत. राज्यातल्या विविध ११ हजार ठिकाणी नुकसान झालं आहे. महाराष्ट्रासह गुजरातमध्येही या वादळाने थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातचा हवाई पाहणी दौरा करणार आहेत. त्यावरुन, भाजपा विरुद्ध महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. 

तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दोन्ही विरोधी पक्षनेते कोकण दौऱ्यावर आहेत. यावरून भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. (bjp keshav upadhye criticizes uddhav thackeray over tauktae cyclone) भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. केशव उपाध्ये यांनी एकामागून एक ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर, आता भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटरवरुन त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलंय.  

तौक्ते वादळाने झालेलं नुकसान, त्यासाठीची मदत व सर्वात महत्वाचे लोकांना आधार देण्यासाठी पंतप्रधान गुजरातमध्ये आहेत. तर विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस हे कोकणात पोहोचलेत. मग, मुख्यमंत्री साहेब तुम्ही आमचे कुटुंबप्रमुख आहात किमान मुंबईत तरी दौरा करा, असा टोला चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन लगावला आहे. त्रस्त जनता मातोश्रीबाहेर आंदोलन करते आता तरी निघा, असे वाघ यांनी म्हटलंय. 

10 हजार हेक्टर क्षेत्र बाधित

तौत्के चक्रवादळाने महाराष्ट्रात १० हजार हेक्टर शेती क्षेत्र बाधित झालं आहे. आत्तापर्यंत १३ हजार ५०० जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. हे चक्रीवादळ गुजरातकडे मार्गस्थ झालं असलं तरीही या वादळाचा महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. आधीच कोरोनाचं संकट सहन करणाऱ्या राज्याला आता या वादळाच्या संकटाचाही सामना करावा लागला. महाराष्ट्रात तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध यंत्रणा सज्ज होत्या. तसेच नागरिकांना लवकरात लवकर मदत कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करा, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासन यंत्रणेला दिले आहेत. 

मोदींचा महाराष्ट्र दौरा का नाही

महाराष्ट्रातही तोक्ते वादळ आले मग महाराष्ट्राबाबत पंतप्रधान भेदभाव का करत आहेत, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तौक्ते वादळाने नुकसान झालेल्या दीव-दमण आणि गुजरातचा हवाई दौरा करणार आहेत. महाराष्ट्रातही तौक्ते वादळ येऊन नुकसान करुन गेले आहे. मग, महाराष्ट्राचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत. महाराष्ट्राबद्दल असलेल्या या भेदभावाबद्दल नवाब मलिक यांनी ट्विट करुन प्रश्न उपस्थित केला आहे.

म्हणून मोदींचा गुजरात दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा संजय राऊत यांनी म्हटले की, तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रात नुकसान झाले आहे. संकटाच्यावेळी कोणावरही टीका करणे योग्य नाही. मात्र, गुजरात हे पंतप्रधान मोदी यांचे स्वत:चे राज्य आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमधील सरकार कमजोर आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे फक्त गुजरातचा दौरा करत असावेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम आहेत, याचीही त्यांना खात्री पटली असावी, असं संजय राऊतांनी सांगितलं. 

Web Title: 'Modi's Gujarat tour, Fadnavis' Konkan, CM Saheb, do it in Mumbai', chitra wagh on taukte cyclone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.