मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मानसिकता कडवट आणि हिंसक आहे. राजकीय शालीनतेचा अभाव असल्यानेच त्यांच्या भाषणात चीड, द्वेष, कटुता भरलेली असते. मोदींची सत्ता आता औटघटकेची राहिली आहे. त्यामुळे त्यांनी आता विरोधकांना धमकावण्याची भाषा करू नये, अशा शब्दांत काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींवर टीकेची झोड उठवली.
काँग्रेसच्या जाहीरनाम्याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शर्मा बोलत होते. या वेळी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा, ऊर्मिला मातोंडकर, प्रिया दत्त, एकनाथ गायकवाड यांच्यासह विविध नेते उपस्थित होते.
काँग्रेस जाहीरनाम्यात देशहिताच्या, विकासाच्या घोषणांचा समावेश आहे. विकासाची पंचसूत्रीच या जाहीरनाम्याच्या माध्यमातून काँग्रेसने मांडल्याचे शर्मा यांनी या वेळी सांगितले. काँगे्रस सत्तेत आल्यास किमान वेतन हमी दिली जाईल. सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याच अनुदानाला धक्का न लावता पाच कोटी कुटुंबांना दरवर्षी ७२ हजार रुपये दिले जातील. शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्यात येईल, असेही शर्मा यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत कोणत्याच आश्वासनाची पूर्तता केली नाही. देशात भीतीचे वातावरण आहे. परकीय गुंतवणूक रोडावली आहे. देशाची अर्थव्यवस्था कमकुवत बनली असल्याचा आरोपही शर्मा यांनी केला. निवडणुकीतील पराभव स्पष्टपणे दिसू लागल्याने मोदी सैरभैर झाले असून विरोधकांना धमक्या देत आहेत. जनतेच्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत. पाच वर्षांत त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. पत्रकारांच्या प्रश्नांना ते घाबरतात, ते उत्तरच देऊ शकणार नाहीत म्हणून ते फक्त भाषणे ठोकतात.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना खुल्या चर्चेचे थेट आव्हान दिले आहे. आतंकवाद, भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांवर खुल्या चर्चेचे आव्हान मोदींनी अद्याप स्वीकारलेले नाही. मोदी घाबरतात म्हणून चर्चेपासून पळ काढतात, असेही यावेळी आनंद शर्मा म्हणाले.निरुपम यांची अनुपस्थितीआजच्या कार्यक्रमास मुंबईतील दिग्गज नेते, मुंबईतील लोकसभेचे उमेदवार उपस्थित होते. अगदी उत्तर पूर्व मुंबईतील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दिना - पाटील यांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली. मात्र, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि उत्तर पश्चिमचे उमेदवार संजय निरुपम यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. प्रचारात व्यस्त असल्याने निरुपम येऊ शकले नसल्याचा खुलासा काँग्रेस नेत्यांनी या वेळी केला. मात्र, निरुपम यांच्या अनुपस्थितीमुळे पक्षातील गटबाजी आणि धुसफुस अद्याप कायम असल्याची चर्चा आहे.भाजप सर्वांत मोठा जाहिरातदारजाहिरातीत भाजपने नेटफ्लिक्स्, अॅमेझॉन, रिलायन्स अशा सर्व कंपन्यांना मागे टाकले आहे. सध्या सरकारच सर्वांत मोठी जाहिरातदार बनली आहे. आपला प्रपोगंडा राबविण्यासाठी भाजपने आतापर्यंत जाहिरातींवर ४,३९७ हजार कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप शर्मा यांनी केला.