मुंबई : प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, लहान मुलांच्या दुर्धर शस्त्रक्रिया यासारख्या जंतुसंसर्गाच्या दृष्टीने तुलनेने अधिक संवेदनशील असणाऱ्या शस्त्रक्रियांसाठी ‘मॉड्युलर आॅपरेशन थिएटर’ असणे अधिक योग्य मानले जाते. त्यामुळे आता मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमधील शस्त्रक्रिया कक्षांपैकी नऊ शस्त्रक्रिया कक्ष अत्याधुनिक अशा ‘मॉड्युलर आॅपरेशन थिएटर’मध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत.महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांमधील नऊ आॅपरेशन थिएटर ही अत्याधुनिक करण्यासाठी, २०१७-१८च्या अर्थसंकल्पीय अंदाजात २१ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. या वर्षाअखेरीस केईएम रुग्णालयातील पाच, तर बा. य. ल. नायर रुग्णालय आणि लोकमान्य टिळक रुग्णालयातील प्रत्येकी दोन आॅपरेशन थिएटरचा कायापालट करण्यात येणार आहे. राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयात अर्थात केईएम रुग्णालय व सेठ गो. सु. वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत सध्या असणारे ५ शस्त्रक्रिया कक्ष हे ‘मॉड्युलर आॅपरेशन थिएटर’मध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत. यामध्ये ‘युरॉलॉजी’ (मूत्ररोगचिकित्साशास्त्र) विभाग, बालरोग शल्यचिकित्सा विभाग आणि ‘प्लास्टिक सर्जरी’ इ. विभागातील आॅपरेशन थिएटरचा समावेश आहे, तर बा.य.ल. नायर रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयातील ‘युरॉलॉजी’ विभागात सध्या असणारे दोन शस्त्रक्रिया कक्ष ‘मॉड्युलर आॅपरेशन थिएटर’मध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत. याचप्रमाणे, शीव (सायन) परिसरातील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात देखील ‘युरॉलॉजी’ विभागातील दोन कक्ष रूपांतरित करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)आॅपरेशन थिएटरची वैशिष्ट्ये ‘मॉड्युलर आॅपरेशन थिएटर’च्या भिंती व छत हे एका विशिष्ट गुणवत्तेच्या स्टेनलेस स्टीलपासून तयार केलेले असते, तसेच यावर विशिष्ट प्रकारचा जंतुप्रतिबंधक रंगदेखील असतो. हा रंग जीवाणू प्रतिबंधक व बुरशी-प्रतिबंधक असतो, ज्यामुळे या प्रकारच्या आॅपरेशन थिएटरमध्ये रुग्णाला जंतुसंसर्ग होण्याची शक्यता तुलनेने कमी असते. हे कक्ष ‘प्री-फॅब्रिकेटेड’ पद्धतीचे असल्याने, अत्यंत कमी कालावधीत उभारणे व कार्यान्वित करणे शक्य असते.या कक्षांमध्ये शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणारे अत्याधुनिक दिवे, दरवाजे, आॅपरेशन कंट्रोल पॅनल, क्ष-किरण यंत्रणा, आॅपरेशन टेबल इत्यादी सुविधादेखील असणार आहेत.या कक्षांमध्ये हवा शुद्ध करणारे अत्याधुनिक यंत्रदेखील असणार आहे, ज्यामुळे हवेच्या माध्यमातून होणाऱ्या संभाव्य जंतुसंसर्गाला प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे.
पालिका रुग्णालयांत मॉड्युलर आॅपरेशन थिएटर
By admin | Published: April 20, 2017 3:04 AM