Join us

मोहन भागवत मशिदीत गेले, मग त्यांनी हिंदुत्त्व सोडलं का? ठाकरेंनी दाखवला आरसा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 3:56 PM

अडीच-तीन वर्षापूर्वी आम्हाला गृहित धरून राजकारण केले होते. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊच शकत नाही

मुंबई  - सध्या राजकारणात काही वाईट परंपरा, चाली सुरू आहेत. त्यावर आघात करण्यासाठी ठाकरे-आंबेडकराची पुढची पिढी वारसदार एकत्र येऊन देश प्रथम या उद्दिष्टावर काम करणार आहोत असं सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा मुंबईत करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. यावेळी, हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला लक्ष्य करणाऱ्या भाजप आणि शिंदे गटावरही उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला. त्यांनी केलं ते सगळं बरोबर आणि आम्ही केलं की, आम्ही हिंदुत्त्व सोडलं, असे उदाहरणादाखल सांगत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला. 

अडीच-तीन वर्षापूर्वी आम्हाला गृहित धरून राजकारण केले होते. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊच शकत नाही. शरद पवारांचा लौकीक तुम्हाला माहित्येय. कधीपण दगा देतील असं मला काहींनी सांगितले. मी त्यांच्याकडे बघत राहिलो आणि माझ्याच लोकांनी दगा दिला. आता एकूण राजकारण जे सुरू आहे ते दुसऱ्याचं घर फोडून स्वत:चं घर सजवणारी औलाद सत्तेवर येऊ बघतेय ती गाडून टाकण्याची गरज आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपकडून सातत्याने बाळासाहेबांचं हिंदुत्त्व् उद्धव ठाकरेंनी सोडलं असा प्रचार केला जातो, त्यावरही उद्धव ठाकरेंनी टोला लगावत प्रश्न उपस्थित केला. 

आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी मिशिदीत जाऊन भेट दिली. भाजपने जम्मू आणि काश्मीरमध्ये पीडीपीसोबत युती करुन सरकार स्थापन केलं. जर त्यांनी असं काही केलं तर ते बरोबर असतं. आणि, आम्ही काही केलं की, लगेच हिंदुत्त्व सोडलं, असा प्रपचार केला जातो. हे बरोबर नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. प्रकाश आंबडेकर यांनीही यावेळी, उद्धव ठाकरेंचं हिंदुत्त्व हे प्रबोधनकारांचं हिदुत्त्व असल्याचं म्हटलं.  

भाजपला मित्रही नको आहेत

गरिबांचा जो भ्रमनिराश झालेला आहे तो दूर करण्याची गरज आहे. कुठल्याही गोष्टीला उशीर होत नाही. सुरुवात करण्याची जी गरज असते ती वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युतीने झालीय. गेल्या लोकसभेला काँग्रेस-राष्ट्रवादीचं प्रकाश आंबेडकरांनी नुकसान केले असेल पण आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधातच लढलो होतो. भाजपासोबत आमची युती होती. त्यांनी स्वार्थापायी ही युती तोडली. भाजपानं दगाफटका केला. आत्ताचं भाजपा नेतृत्व आहे त्यांनी त्यांच्या पक्षातीलच नेतृत्वाची एक फळी कापून टाकली आहे. राजकारण विरोधक, शत्रू नको असं समजू शकतो पण भाजपाला मित्रही नकोत असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

हे प्रबोधनकरांचं हिंदुत्त्व - प्रकाश आंबेडकर

प्रबोधनकारांचे जे हिंदुत्व होते त्यावर चालण्याचे धोरण उद्धव ठाकरेंनी घेतलंय. समाज सुधारण्यासाठी काही भूमिका कडवटपणाने घ्याव्या लागतात. प्रबोधनकारांनी ती घेतली होती. हीच लाईन पुढे घेऊन जाणार आहोत. आरएसएस आणि भाजपाचं जे नकारात्मक हिंदुत्वाचं राजकारण आहे त्यापेक्षा समाजव्यवस्था एकत्र कशी आली पाहिजे. ती कुठल्या मुद्द्यावर येईल त्याची मांडणी आमच्या युतीतून करणार आहोत असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. 

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेवंचित बहुजन आघाडी