मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, गोरेगावच्या रणरागिणी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या मोहिनी रघुवीर अणावकर यांची मुंबई निवारा हक्क संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी ही नियुक्ती केली आहे.
मुंबई महाराष्ट्रातील तमाम गरीब, कष्टकरी, झोपडपट्टीवासीय, झोपडपट्टी पुनर्वसन पीडित, म्हाडा पीडित यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्या सातत्याने संघर्ष करीत आहेत. त्यांना या कार्याचा चांगला अनुभव असून पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या निवारा हक्क आघाडीच्या माध्यमातून मोहिनी अणावकर या झोपडपट्टी धारक, एस आर ए पीडित विकासकांकडून होत असलेली फसवणूक व शोषण याविरुद्ध न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील, अशी आशा व्यक्त केली आहे.
त्यांच्या या नवीन जबाबदारी मुळे पुनश्च एकदा सामाजिक कार्याच्या मुख्य प्रवाहात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. माजी रोजगार मंत्री आणि ज्येष्ठ समाजवादी नेते साथी निहाल अहमद हे महाराष्ट्र जनता पक्षाचे अध्यक्ष असतांना त्यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले असून ज्येष्ठ समाजवादी नेते रघुवीर उर्फ बाबा अणावकर यांची कन्या या नात्याने समाजसेवेचे बाळकडू त्यांना बाबांकडूनच मिळाले आहे. मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जनता पक्षाचे कार्य मोठ्या प्रमाणावर करुन आपला सामाजिक कार्याचा ठसा उमटविला आहे. घर हक्क परिषदेच्या अध्यक्षा म्हणून त्यांच्या अनुभवाचा आता पुन्हा एकदा त्यांना उपयोग होईल, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.