मुंबई - भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या कारवर शुक्रवारी मातोश्रीबाहेर हल्ला झाला. या हल्ल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलाच सामना रंगला आहे. भाजप नेते आक्रमक झाले असून एकामोगोमाग एक ट्विट करत राज्य सरकारवर टिका करत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करुन या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच, डरपोक लोकांनी सत्तेच्या भरवशावर केलेला हा उन्माद असल्याचंही त्यांनी म्हटलयं. तर, नितेश राणेंनी मौका सभी को मिलता है, असे म्हणत थेट इशाराच दिलाय.
मोहित कंबोज यांच्या गाडीमध्ये अॅसिड होते. ते शिवसैनिकांवर टाकण्याचा कट कंबोज यांचा डावा होता. मातोश्रीबाहेरील शिवसैनिकांना चिथावण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचा आरोप खासदार विनायक राऊतांनी केला आहे. त्यावर मोहित कंबोज यांनी उत्तर दिले आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई पोलिसांना लक्ष्य केले आहे.
''मोहित भारतीय यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे डरपोक लोकांनी सत्तेच्या भरवशावर केलेला उन्माद आहे. महाराष्ट्रात सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलाल तर तुम्हाला जिवे मारू, ही नवी संस्कृती सुरू झाली आहे. पण, तरीही महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध हा लढा थांबणार नाही. आता मुंबई पोलिस या हल्लेखोरांवर कारवाई करणार की एखादे कथानक रचून, या भेकड हल्लेखोरांना वाचविणार?, असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे. मुंबई शहरात आपण सीसीटीव्हीचे जाळे सर्वत्र उभारले आहे, त्यातून संपूर्ण सत्य बाहेर येईलच. या हल्ल्याचा तीव्र निषेध करताना दोषींवर कठोर कारवाईची आमची मागणी आहे, असेही ते म्हणाले.
मुंबईत विरोधी पक्षातील नेते जे भ्रष्टाचार उघडकीस आणतात, त्यांच्यावर अशाप्रकारे होत असेलला हल्ला निंदनीय आहे. मला वाटतंय, हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी, मुंबई पोलिसांनी याचा तपास करावा. मुंबई पोलिसांनी डोकं चालवून मला मॉबपासून वाचवलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो. मात्र, ठाकरे सरकार अशाप्रकारे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही घाबरणार नाहीत, आमची लढाई यापुढेही सुरूच राहिल, हम झुकेंगे नही... अशी प्रतिक्रिया मोहित कंबोज यांनी हल्ल्यांनंतर एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे.
विनायक राऊतांच्या आरोपला उत्तर
माझ्यावर हल्ला झाला. पोलिसांचे मी आभार मानतो, परंतू त्यांनी कारवाई करावी. सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे. मंत्री अस्लम शेख, प्रसाद लाड यांच्यासह आम्ही एका लग्नाला गेलो होतो. ते माझ्या मागे पुढेच होते. माझ्या गाडीत अॅसिड ठेवले हे विनायक राऊत सांगताहेत, ते त्यांनी ठेवले होते का? ते गाडीत बसले होते का? असा संतप्त सवाल कंबोज यांनी केला आहे. यावर कंबोज यांनी जावेद-सलीम जोडीमध्ये आणखी कोणाला घुसवू नका, असे ते म्हणाले.
दरम्यान मोहित कंबोज यांनी हल्ल्यानंतर एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी आपण गाडीतच होतो, असे म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी या शिवसैनिकांवर कारवाई करावी, अशीही मागणी केली आहे.
नेमके काय घडले...
थोड्या वेळापूर्वी मातोश्री परिसरात भाजपा नेते मोहित कंबोज यांच्यावर हल्ला झाला आहे. कंबोज यांची गाडी शिवसैनिकांनी पाहिली आणि तिकडे धाव घेतली. यावेळी कंबोज यांचे सुरक्षारक्षक आणि तिथे असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत कंबोज यांची सुरक्षा केली. यावेळी कंबोज यांना पुढे पाठवून देण्यात आले. कंबोज रेकी करण्यासाठी आलेले असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.