मुंबई : भाषा, प्रांत आणि जातीय अस्मितेमुळे आपली ओळखच संकुचित बनत चालली आहे. या सर्व भेदांना बाजूला सारत भारतीय ही एकच ओळख दृढ करण्याच्या उद्देशाने प्राउड भारतीय फाउंडेशन कार्यरत राहील, अशी ग्वाही भाजपा युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष मोहित कंबोज यांनी गुरुवारी दिली.
प्राउड भारतीय फाउंडेशनच्या औपचारिक उद्घाटन सोहळ्यात मोहित कंबोज यांनी संस्थेच्या ध्येयधोरणांविषयी माहिती दिली. व्यक्तीच्या आडनावापासूनच भेद रुजण्यास सुरुवात होते. संस्थेचा संस्थापक म्हणून मी माझे ‘कंबोज’ हे आडनावच बदलले आहे. यापुढे कंबोज या आडनावाऐवजी ‘भारतीय’ हेच माझे आडनाव असेल. माझे आडनाव मी ‘भारतीय’ असे बदलले असून त्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याचे मोहित यांनी सांगितले. विविध उद्देशांनी देशभरात स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. त्यात ‘प्राउड भारतीय फाउंडेशन’ ही विविध प्रकारचे भेदाभेद दूर सारत फक्त भारतीयत्वाची ओळख समाजात रुजविण्यासाठी कार्य करेल. विशेषत: एखाद्या व्यक्तीस भाषा, प्रांताची ओळख सांगणारे नाव, आडनाव बदलायचे असल्यास आवश्यक कायदेशीर प्रक्रियेची माहिती, साहाय्य देणे; भेदभावाची शिकार झालेल्या व्यक्तीस साहाय्य, त्यांच्यासाठी हेल्पलाइन; भारतीयत्वाची ओळख रुजविणाऱ्या व्यक्ती, संस्थांना व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचे मोहित भारतीय यांनी या वेळी सांगितले.
या वेळी फाउंडेशनच्या माध्यमातून मालाड येथील अनाथ आश्रमातील ३५ मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. या मुलांना जे काही शिक्षण घ्यायचे असेल त्याचा सर्व खर्च फाउंडेशन करेल. डॉक्टर, इंजिनीअर किंवा थेट नासामध्ये संशोधन करायचे असेल आणि त्यासाठी भविष्यात त्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार असेल तर फाउंडेशन त्यांचा खर्च उचलेल, असे मोहित भारतीय म्हणाले.