Mohit Kamboj On Sanjay Raut: बाप-बेटे सोडा, पण सलीम-जावेद नक्की जेलमध्ये जाणार; मोहित कंबोज यांचं राऊतांचा प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 02:54 PM2022-02-16T14:54:11+5:302022-02-16T14:55:02+5:30
Mohit Kamboj On Sanjay Raut: बाप-बेटे जेलमध्ये जातील तेव्हा जातील, पण लवकरच सलीम-जावेद जेलमध्ये जातील. फक्त सलीम आधी जाणार की जावेद यामध्ये स्पर्धा सुरू आहे, असा पलटवार मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांच्या टीकेवर केला आहे.
Mohit Kamboj On Sanjay Raut: बाप-बेटे जेलमध्ये जातील तेव्हा जातील, पण लवकरच सलीम-जावेद जेलमध्ये जातील. फक्त सलीम आधी जाणार की जावेद यामध्ये स्पर्धा सुरू आहे, असा पलटवार मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांच्या टीकेवर केला आहे. 'बाप-बेटे जेलमध्ये जाणार वेट अँड वॉच. कोठडीचे सॅनिटायझेशन सुरू आहे', असं ट्विट आज शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी केलं. राऊतांच्या ट्विटचा रोख किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा निल सोमय्या यांच्याकडे असल्याचं सांगितलं जात आहे. राऊतांच्या या टिकेला मोहित कंबोज यांनी आज एक व्हिडिओ ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोहित कंबोज यांच्यावरही आरोप केले होते.
"संजय राऊतांनी आज बाप-बेटे जेलमध्ये जाणार असं ट्विट केलं. पण राऊत साहेब बाप-बेटे जेलमध्ये जाणार की नाही हे वेळच सांगेल, पण सलीम आणि जावेद जेलमध्ये नक्कीच जातील. सलीम आणि जावेद नेमके कोण हे तुम्हाला कळालंच असेल. आता सलीम आणि जावेदमध्ये सर्वात आधी जेलमध्ये कोण जाणार यात शर्यत लागली आहे. सलीम-जावेद पैकी जेलमध्ये पहिलं कोण जाणार आणि अनिल देशमुख यांच्यासोबत पहिली भेट कुणाची होणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. टिफीन द्यायला बाप-बेटे पण येतील आणि आम्हीही येऊ तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला कळेल की सलीम-जावेदचे काय कांड होते. पदांचा गैरवापर करुन कसा भ्रष्टाचार केला हे सर्वांना कळेल", असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.
जेल तो सलीम - जावेद जाएँगे ! pic.twitter.com/VLQD15hJR2
— Mohit Kamboj Bharatiya - मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) February 16, 2022
मोहित कंबोज यांनी उल्लेख केलेले सलीम-जावेद नेमके कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे भाजपा विरुद्ध संजय राऊत सुरू झालेलं हे युद्ध आता दररोज नवनवं वळण घेण्याची शक्यता आहे. आज संजय राऊत यांनी ट्विटरवर ट्विट्सची मालिका सुरू करत किरीट सोमय्या यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. संजय राऊत म्हणाले की, दुसऱ्यांना तुरुंगात टाकण्याच्या धमक्या देता, आता तुम्ही तुरुंगात जा. मी तुम्हाला काय सांगितलं आहे की, भाजपाचे साडेतीन नेते तुरुंगामध्ये जाणार आहेत. मी ती नावे काल सांगेन, अशी तुमची अपेक्षा होती. जसजसे ती आतमध्ये जातील, तसतसे तुम्ही मोजत जा. किरीट सोमय्या आणि नील सोमय्या हे बाप-बेटे नक्कीच तुरुंगात जाणार. बाप-बेटे १००% जेलमध्ये जात आहेत, असे संकेतही संजय राऊत यांनी दिले.
सलीम - जावेद दोनो जेल जाएँगे !
— Mohit Kamboj Bharatiya - मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) February 16, 2022
Wait and Watch ! https://t.co/iGYafIArfF