मुंबई: आज संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी(ST Workers Strike) अचानक आक्रमक पवित्रा घेतला. काल न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन संपले असे वाटत असताना आज अचानक शेकडोच्या संख्येने आलेल्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानात घुसून घरावर चप्पल आणि दगडफेक केली. या प्रकरणात इंजेलिजन्स फेल्युअर असल्याचे मत भाजप नेते मोहित कंबोज(Mohit Kamboj) यांनी व्यक्त केले आहे.
मोहित कंबोज यांनी ट्विटरवरुन या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ''शरद पवार यांच्या घराबाहेर झालेल आंदोलन हे संपुर्णपणे मुंबई पोलिसांच इंटेलिजन्स फेल्युअर आहे. पोलीस आयुक्त संजय पांडे हे सध्या स्वताच्याच पीआरमध्ये गुंतले आहेत. भाजपच्या लोकांच्या विरोधातच काय काय चुकीच्या केसेस दाखल करता येतील त्यावरच ते काम करतात. सरकारला माझी विनंती आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. मुंबईकरांच्या सुरक्षेला सर्वात आधी प्राथमिकता द्या," अशी प्रतिक्रिया मोहित कंबोज यांनी दिली आहे.
शरद पवारांच्या निवासस्थानी नेमकं काय झालं?मागील पाच महिन्यांपासून सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन संपले असे वाटत होते. काल न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर संपकरी कर्मचारी शांत होतील आणि आपल्या कामावर रुजू होतील, अशी अपेक्षा होती. पण, तसे न होता आज पुन्हा एकदा ते विलिनीकरणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले. शेकडोच्या संख्येने पुरुष आणि महिला कर्मचारी शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानात घुसले. यावेळी कर्मचाऱ्यांकडून शरद पवारांच्या घरावर चप्पल आणि दगडफेक करण्यात आली.
कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यातपोलिसांना सुरुवातीला कर्मचाऱ्यांना कंट्रोल करणे अवघड झाले होते, पण नंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा आला आणि शेकडो कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. कर्मचाऱ्यांची संख्या शेकडोंच्या घरात असल्याने पोलिसांनी पोलीस व्हॅनसह स्कूलबस मागवल्या होत्या. त्यात पुरुषांसह महिला कर्मचाऱ्यांनाही बसवण्यात आले. यावेळी अनेक कर्मचारी सरकारविरोधात घोषणाबाजी देण्यासोबतच विलिनीकरणाची मागणी केली.