Join us  

मुंबईत पाच वेळ हनुमान चालीसा ऐकणार यासाठी राज ठाकरेंचे आभार मानतो : मोहित कंबोज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2022 8:50 PM

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतीमा लोकांनी काल राज ठाकरे यांच्यात पाहिली; मोहित कंबोज यांचं वक्तव्य.

"मुंबईत रोज आता पाच वेळा लोक हनुमान चालीसा ऐकतील यासाठी मी मनापासून राज ठाकरे यांचे आभार मानतो. ज्यावर अजान होते असे अनधिकृत लाऊडस्पीकर उतरवले पाहिजेत. मुंबई पोलीस आयुक्तांनीही यावर कारवाई केली पाहिजे. ही मागणी गेल्या काही दिवसांपासून भाजपद्वारे करण्यात येत होती. तसंच हा जो विषय राज ठाकरे यांनी उचलला आहे, त्यांना सर्व हिंदूंचे आभार आहेत," असं वक्तव्य भाजपचे मोहित कंबोज यांनी केलं. मशिदींवरील भोंगे उतरवले गेले नाहीत, तर आम्ही मशिदीसमोर दुप्पट लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावू, असा इशारा शनिवारी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला होता. 

"जर अनधिकृत लाऊडस्पीकर्स असतील तर उतरवले गेले पाहिजे असे न्यायालयाचेही निर्णय आले आहेत. संजय पांडे यांनी न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करावी आणि अनधिकृत लाऊडस्पीकर वरून जे अजान होतात, ते उतरवून टाकावे," असं मोहित कंबोज म्हणाले. "आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. अजान ही झालीच पाहिजे. परंतु लाऊडस्पीकरवर जी अजान होते ती बंद झाली पाहिजे ही आमची मागणी आहे मुंबई पोलीस आयुक्तांकडे आहे," असंही ते म्हणाले. यावर शिवसेनेची काय भूमिका आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष गेले अनेक वर्ष हिंदुत्वाबद्दल बोलत आला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची झलक लोकांनी राज ठाकरे यांच्यात पाहिली. शिवसेनेनं आपलं दुतोंडी राजकारण बंद करून ते लाऊडस्पीकरवरील अजानच्या बाजूनं आहेत की विरोधात हे त्यांनी सांगितलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

टॅग्स :राज ठाकरेमनसेशिवसेनाबाळासाहेब ठाकरे