Join us

मोहित कंबोज यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा, फडणवीसांवरील टीकेला उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 7:59 PM

आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी उडी घेतलीय. 

मुंबई - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्याने उद्धव ठाकरे यांची बाजू माध्यमांमध्ये भक्कम आणि आक्रमकपणे मांडत असतात. त्यात संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी देणारे प्रकरण समोर आले. तू दिल्लीत भेट तुला एके ४७ ने उडवतो. तुझा मुसेवाला करतो तू आणि सलमान फिक्स अशी धमकी संजय राऊतांना व्हॉट्सअपद्वारे देण्यात आली. त्यानंतर विरोधी पक्षातीलन नेत्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय. याप्रकरणी सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला. त्यात, आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी उडी घेतलीय. 

१९९३ च्या बॉम्बस्फोटात सामील असलेल्या लोकांशी जमीन व्यवहारात अटक झाल्यानंतर दाऊद इब्राहिमचा फ्रंट मॅन नवाब मलिक याचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यास तुमची काय असमर्थता होती? नैतिकदृष्ट्या ज्येष्ठ नेत्या म्हणून तुम्ही अपयशी ठरला आहात, असे म्हणत मोहित कंबोज यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधलाय.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

खासदार संजय राऊत यांना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही आपण बोलणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. तसेच, झेपत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले. त्यावरुन, आता प्रत्तुत्तर देण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीसांचे जवळी कार्यकर्ता असलेले मोहित कंबोज यांनी सुप्रिया सुळेंवर पलटवार केला आहे. त्यात, कंबोज यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात नवाब मलिक यांचा राजीनामा का घेतला नाही?, असा प्रश्न उपस्थित केलाय. 

फडणवीसांचा खा. सुळेंवर अप्रत्यक्ष निशाणा

या धमकीबाबत कुणीही चेष्टा केली नाही. मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे. मी गृहमंत्रिपदावर राहिलो नाही तर बरे होईल असं अनेकांना वाटते. पण मी गृहमंत्री राहणार आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदाचा कार्यभार दिला आहे. जे कुणी चुकीचे काम करतील त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्री म्हणून मी यापूर्वीही ५ वर्ष कारभार सांभाळला आहे. आताही जे बेकायदेशीर कामे करतील त्यांना सोडणार नाही, असा इशारा देत फडणवीसांनी सुप्रिया सुळेंच्या टीकेला प्रत्युत्तरही दिलंय. 

काय म्हणाले फडणवीस

याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संजय राऊतांना जी धमकी आली ती खरी आहे. याचा तपास केला असता एका व्यक्तीला ताब्यात घेतले. दारुच्या नशेत त्या व्यक्तीने अशाप्रकारे धमकी दिली असा प्राथमिक रिपोर्ट आहे. मात्र, संपूर्ण तपास केला जाईल. कुणीही धमकी दिली असेल तर त्यावर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रात कुणी कुणाला धमकी दिली तरीदेखील याठिकाणी सरकार, पोलीस शांत बसणार नाहीत असं त्यांनी सांगितले.  

टॅग्स :सुप्रिया सुळेदेवेंद्र फडणवीसमोहित कंबोज भारतीय