मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणात मशिदीवरील अनिधिकृत भोग्यांमधून चालणाऱ्या अजानविरोधात हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केले. राज ठाकरेंच्या या भूमिकेवरुन त्यांच्या मोठ्या प्रमाणात टिका झाली. तर, काहींनी त्यांच्या या भूमिकेचं समर्थन करत दुसऱ्याच दिवशी काही ठिकाणी हनुमान चालिसा लावली होती. विशेष म्हणजे राज यांच्या भूमिकेचे भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनीही स्वागत केले, तसेच हनुमान चालीसा लावण्यासाठी मोफत लाऊडस्पीकर(भोंगा) देण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर त्यांच्याकडे 5 हजार जणांनी भोंग्यासाठी मागणी केली आहे.
भाजपच्या गर्भश्रीमंत नेत्यांपैकी एक असलेल्या मोहित कंबोज यांनी ट्विट करुन मोफत भोंगे देणार असल्याचं म्हटलं होतं. "ज्यांना मंदिरात लाऊडस्पीकर लावायचे आहे, त्यांनी आमच्याकडून मोफत घेऊन जावे. सर्व हिंदूंचा एकच आवाज! जय श्री राम! हर हर महादेव," असे कंबोजने ट्विट केले होते. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने भोंग्या संदर्भात काय ऑर्डर दिली, याची माहितीने त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली होती. आता, लोकांनी या मोफत लाऊडस्पीकर योजनेला मोठा प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मनसेकडून हनुमान चालीसा लावण्यात आली
दरम्यान, राज ठाकरेंच्या भूमिकेनेतर महाराष्ट्रातील अनेक भागात मनसे नेत्यांकडून हनुमान चालीसा लाऊडस्पीकरवर वाजवली जात आहे. नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींमधील लाऊडस्पीकर बंद करण्याची मागणी केली होती. राज ठाकरे यांनी शनिवारी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदींबाहेरील लाऊडस्पीकर हटवण्याचा इशारा दिला होता. तसेच, अजानचा विरोध म्हणून हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केले होते.