मुंबई - गेल्या काही काळामध्ये मुंबईतील ड्रग्स रॅकेटविरोधातील भूमिका, मशिदीवरील भोंग्यांना केलेला विरोध यामुळे भाजपाचे नेते मोहित कंबोज चर्चेत आले होते. दरम्यान, आता मोहित कंबोज हे एक नवे आंदोलन हाती घेणार आहेत. मोहित कंबोज यांनी मुंबईतील राजकारण्यांकडून करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम उघडण्याची घोषणा केली आहे. तसेच अनधिकृत बांधकामांविरोधात तरुणांनी एकत्र येऊन आवाज उठवावा, असं आवाहन मोहित कंबोज यांनी केलं आहे.
याबाबत मोहित कंबोज म्हणाले की, माझं मुंबईकर आणि मुंबईतील तरुणांना एक आवाहन आहे. मुंबईत सर्व नियम आणि कायदे हे केवळ सर्वसामान्यांसाठी का आहेत. राजकारण्यांनी अनधिकृत बांधकाम करून ऑफिस, कार्यालय, घरामध्ये बदल केले आहेत. याची कितीतरी उदाहरणे देता येतील. यातील अनेक अनधिकृत बांधकामं ही सर्वच पक्षांच्या नगरसेवकांपासून आमदारांपर्यंत तसेच इतर नेत्यांनी मसल्स पॉवरच्या जोरावर केली आहेत. मात्र महानगरपालिकेच्या नोटिसा केवळ सर्वसामान्य लोकांना येतात. त्यांच्यावर कारवाई होते, दंड भरावा लागतो. मात्र मात्र हे राजकारणी कायद्याच्या चौकटीतून बाहेर का आहेत, असा सवाल मोहित कंबोज यांनी केला.
मी मुंबईतील तरुणांनी या नेत्यांच्या अनधिकृत बांधकामांविरोधात एक मोहीम सुरू करावी, असं आवाहन करतो. मुंबईतील तरुणांनी ज्या नेत्यांनी अनधिकृत बांधकाम तुमच्या भागात, तुमच्या नजरेसमोर केलं आहे. त्याबाबत आरटीआयमधून माहिती घ्या. पेपर काढा. त्यानंतर याची तक्रार सर्व पुराव्यांसह मुंबईचे पालिका आयुक्त आणि वॉर्ड ऑफिसर यांच्याकडे करा. त्याची एक कॉपी मला द्या. ज्यामुळे जर महानगरपालिकेने कारवाई केली नाही तर हायकोर्टात दाद मागून कारवाईचे आदेश आणू शकेन, असे आवाहन मोहित कंबोज यांनी केले आहे.