Join us

कानात ओलावा राहिल्याने होतो बुरशीजन्य संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:06 AM

तज्ज्ञांचे मतलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सध्या कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे अनेक लोक बाहेरून घरात आल्यावर वारंवार आंघोळ करतात. ...

तज्ज्ञांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सध्या कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे अनेक लोक बाहेरून घरात आल्यावर वारंवार आंघोळ करतात. त्यामुळे कानात ओलावा राहिल्याने कोरोनाची लागण झालेली नसलेल्या लोकांच्या कानाला बुरशीजन्य संसर्ग होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा हे प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

कोरोनातून बरे झालेल्या अनेक रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशीचा संसर्ग होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता कानाला बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढताना दिसून येत आहे. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात कानात बुरशी संसर्ग होण्याचे प्रमाण वाढते. सर्व वयोगटातील लोकांमध्ये कानात बुरशी होण्याचा त्रास पाहायला मिळत आहे. या संसर्गामुळे वेळीच निदान व उपचार झाल्यास कान लवकर बरा होऊ शकतो. भविष्यात कानाला होणारे नुकसान टाळता येऊ शकते.

* गंभीर नसले, तरी उपचार आवश्यक

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ्यात कानात संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दररोज बाह्यरुग्ण विभागात १५ ते २० रुग्ण उपचारासाठी येत आहेत. बऱ्याचदा कोरोनाच्या भीतीने अनेक लोक वारंवार हात आणि चेहरा धुतात. यामुळे कानात पाणी शिरल्याने ते योग्य पद्धतीने पुसले जात नाही. कानात पाणी राहिल्याने अशी स्थिती बुरशीच्या वाढीस पोषक ठरते. परिणामी, काळ्या-पांढऱ्या रंगाची ही बुरशी कानात वाढते. कानात बुरशी संसर्ग होणे हे गंभीर नसले तरी उपचार घेणे गरजेचे आहे.

- डॉ. नीलम साठे,

कान-नाक-घसा तज्ज्ञ, केईएम रुग्णालय.

लॉकडाऊनमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’मुळे अनेक जण हेडफोनचा वापर करीत आहेत, यामुळेही कानाला संसर्ग होऊ लागला आहे. हेडफोन वापरण्याचे प्रमाण वाढल्याने कानाच्या बाहेरील भागात त्वचेचा संसर्ग होतो. हेडफोन घातल्याने कानामध्ये हवा शिरत नाही. कानात ओलावा निर्माण होतो. याशिवाय कानात आंघोळीचे पाणी साचल्याने बुरशी होण्याचा धोका वाढतो.

- डॉ. श्रीनिवास चव्हाण, प्रमुख, कान-नाक-घसा विभाग, जे. जे. रुग्णालय

बुरशीजन्य कानात होणारे संक्रमण मुख्यत: कान कालवावर परिणाम करते. दूषित पाण्यात पोहणे, कानाला आघात होणे आणि मधुमेह या कारणांमुळे कानाला संसर्ग होऊ शकतो. कानात पाणी शिरणे अथवा वेळेत ते काढले न जाणे यामुळे कानात बुरशी होण्याची अनेक उदाहरणे सध्या दिसून येत आहेत.

- डॉ. प्रशांत केवले, कान-नाक-घसा तज्ज्ञ

वयोवृद्धांमध्ये कान दुखणे ही एक सामान्य समस्या आहे. कानाला बुरशी संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी कानात पाणी साचू देऊ नका. आंघोळीनंतर कान सुकवा. कानात तेल टाकणे टाळा. कानात मोठ्याने ओरडू नका. कान नियमितपणे स्वच्छ करा. मळ साचलेला असल्यास उपचार घ्या.

- डॉ. शलाका दिघे, कान-नाक-घसा सर्जन

लक्षणे

कान लाल होणे

श्रवणशक्ती कमी होणे

कानाच्या आतील त्वचा खराब होणे

कान दुखणे

जळजळ व सूज येणे

कानाच्या त्वचेला रॅश येणे

कानात तयार झालेला मळ बाहेर न पडणे

उपचार

रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात तपासणी केली जाते.

कानात थेंब आणि औषध देऊन उपचार केले जात आहेत.