पोलिसांना जाळण्याचा प्रयत्न करणारे मोकाटच

By admin | Published: April 11, 2017 01:29 AM2017-04-11T01:29:34+5:302017-04-11T01:29:34+5:30

आंबिवली रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या इराणी वस्तीतील समीर इराणीला जेरबंद करण्याकरिता गेलेल्या दोन पोलिसांवर पेट्रोलमिश्रीत रॉकेल ओतून जीवंत जाळण्याचा

Mokatch, trying to burn the police | पोलिसांना जाळण्याचा प्रयत्न करणारे मोकाटच

पोलिसांना जाळण्याचा प्रयत्न करणारे मोकाटच

Next

- मुरलीधर भवार,  कल्याण

आंबिवली रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या इराणी वस्तीतील समीर इराणीला जेरबंद करण्याकरिता गेलेल्या दोन पोलिसांवर पेट्रोलमिश्रीत रॉकेल ओतून जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्याची घटना घडून तीन दिवस उलटले आहेत. तरी अद्याप पोलिसांनी या इराणी वस्तीवर कठोर कारवाई केलेली नाही. इराणी वस्तीमध्ये कारवाईकरिता गेलेल्या दाजी गायकवाड या पोलिसाला जाळण्याचा प्रयत्न झाला. तर सावंत आणि महाजन या दोन पोलिसांवर हल्ला झाला होता.
इराणी वस्ती ही नेहमीच पोलिसांच्या हिटलिस्टवर राहिलेली आहे. या वस्तीत शेकडो पोलिसांचा ताफा घेऊन अनेक वेळा कोम्बींग आॅपरेशन केलेले आहे. शुक्रवारी या पोलिसांना जाळून मारण्याचा प्रयत्न झाल्यानंतर दोन इराणी आरोपी पळून गेले. मात्र तरीही पोलिसांनी केवळ इराणी महिलांच्या विरोधात पोलिसांवर प्राणघातक हल्ला करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत केवळ तपास सुरु असल्याचे मोघम उत्तर पोलीस देत आहेत.
आरोपी समीर इराणीला पकडण्यासाठी पोलीस गेले होते. त्याची आई मरीयम हिने कांगावा सुरु केला असून माझा मुलगा गेल्या पाच महिन्यांपासून आजारी असल्याने अंथरुणात आहे. त्याच्यावर चोरीचा आरोप असल्याचे पोलीस सांगत असले तरी त्याचा पुरावा त्यांनी दिल्यास मी त्याला पोलिसांपुढे सादर करेन. समीर अंथरुणाला खिळलेला होता तर मग पोलिसांवर हल्ला झाल्यावर तो आणि त्याचा साथीदार पळून का गेले, असा सवाल पोलिसांनी केला आहे. उल्हासनगर पोलीस उपायुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. हे प्रकरण प्रसारमाध्यमांनी उचलून धरल्यावर आता उपायुक्त त्यावर भाष्य करणे टाळत आहेत. इराणी वस्तीवर कारवाईबाबत वरिष्ठांनी मौन बाळगल्यामुळे पोलिसांचे मनोबल खच्ची होत असल्याची भीती चेन स्नॅचिंग विरोधी पथकातील पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

हल्ल्याच्या घटना
- २००८ साली इराणी वस्तीतून पोलिसांनी कलंदर हुसेन इराणी आणि त्याचा मुलगा कंबार याला ताब्यात घेतले. त्यांना नेत असताना वडवली रेल्वे फाटकाजवळ पोलिसांच्या गाडीवर जोरदार दगडफेक झाली. २०१३ मध्ये महात्मा फुले पोलीस ठाण्याने केलेल्या कारवाईत वस्तीतील ७१ जणांची बँक खाती गोठवली.
- मार्च २०१५ मध्ये सोनसाखळी चोरांची टोळी चालवणाऱ्या जग्गू इराणीला अटक केली होती. तर ठाणे पोलीस आयुक्तालयाने दीड वर्षापूर्वी टॉप २० सोनसाखळी चोरट्यांना ‘मोक्का’ लावला होता. त्यात बहुतांश आरोपी इथलेच होते.

सुधारण्याची दिली संधी
माजी पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी इराणी वस्तीतील चोरट्यांना सुधारण्यासाठी समन्वयाचा कार्यक्रम राबवला होता. इराणी वस्तीतील चोरट्यांच्या मुलांची फी काही पोलीस भरतात. त्यांना पर्यायी रोजगाराची संधी दिली. मात्र तरीही काही इराणी पुन:पुन्हा चोरीकडे वळतात. इराणी वस्तीत दोन गट असून तेच एकमेकांच्या विरोधात पोलिसांना माहिती पुरवतात.

Web Title: Mokatch, trying to burn the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.