मोखाडा ग्रामीण रुग्णालय सलाईनवर
By Admin | Published: July 18, 2014 12:36 AM2014-07-18T00:36:17+5:302014-07-18T00:36:17+5:30
मोखाडा हा अतिग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो. आदिवासीबहुल असलेल्या या तालुक्यातील आरोग्यसेवा सध्या अंथरूणाला खिळली आहे.
मोखाडा ग्रामीण : मोखाडा हा अतिग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो. आदिवासीबहुल असलेल्या या तालुक्यातील आरोग्यसेवा सध्या अंथरूणाला खिळली आहे. या रूग्णालयामध्ये सोयी-सुविधांचा अभाव आहेच, परंतु अस्वच्छतेमुळे या रूग्णालयात उपचारासाठी दाखल होण्यास ग्रामस्थही नाखूश आहेत.
१९७८ साली मोखाडा ग्रामीण रूग्णालयाची स्थापना करण्यात आली. या भागातील आदिवासी जनतेला योग्य त्या आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात, याकरिता हे रुग्णालय सुरू करण्यात आले. गेल्या ३५ वर्षांत सोयी-सुविधा वाढल्या नाहीच, परंतु डॉक्टर व कर्मचाऱ्यांअभावी हे रुग्णालयच आजारी पडले. हे रुग्णालय स्थापन करतेवेळी ३० खाटांचे हे रुग्णालय होते. आज ३५ वर्षांनंतर तालुक्याची लोकसंख्या लाखाच्या घरात गेली असतानाही त्यामध्ये एका खाटेनेही वाढ झाली नसल्याने रूग्णांना उपचाराकरिता लादीवरच झोपावे लागते.
मोखाडा तालुका हा बालमृत्यू, कुपोषण यामुळे सतत चर्चेत राहिला आहे. शासनातर्फे कोट्यवधी रू. चा निधी मिळूनही या रूग्णालयामध्ये ग्रामस्थांना योग्य ते उपचार मिळत नाहीत. या रूग्णालयात स्त्री रोग व बालरोगतज्ज्ञ नसल्यामुळे महिलांना उपचारासाठी नजीकच्या नाशिक जिल्ह्यात जावे लागते. या भागात अनेकदा पालकमंत्र्यांचा दौरा झाला, परंतु परिस्थितीत बदल होऊ शकला नाही. ग्रामीण रूग्णालयात नर्स व डॉक्टर यांचा मनमानी कारभार सुरू असून त्यास आळा घालण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याची तक्रार मोखाड्याचे ग्रामस्थ सोमनाथ शितोळे यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)