मूकनाट्य ‘स्ट्रीट माईम’च्या सादरीकरणाने मुंबईकर झाले मंत्रमुग्ध
By admin | Published: January 2, 2017 06:43 AM2017-01-02T06:43:38+5:302017-01-02T06:43:38+5:30
नववर्षाच्या स्वागतासाठी निघालेल्या मुंबईकरांसाठी माईम आर्ट अँड कल्चरच्या वतीने प्रथमच ‘स्ट्रीट माईम’चे सादरीकरण शनिवारी रात्री उशिरा करण्यात आले.
महेश चेमटे, मुंबई
नववर्षाच्या स्वागतासाठी निघालेल्या मुंबईकरांसाठी माईम आर्ट अँड कल्चरच्या वतीने प्रथमच ‘स्ट्रीट माईम’चे सादरीकरण शनिवारी रात्री उशिरा करण्यात आले. ‘सलाम मुंबई पोलीस’ आणि ‘नववर्षाच्या शुभेच्छा’ या थीमवर आधारित रस्त्यावरील मूकनाट्याचे सादरीकरण पाहून मुंबईकर मंत्रमुग्ध झाले.
माणूस आणि विचार यांच्यातील संवाद पार पडण्यासाठी शांतता हाच एकमेव दुवा आहे, असे जगप्रसिद्ध मूकनाट्य कलाकार मार्शल मार्शो यांनी म्हटले आहे. याचाच अनुभव मुंबईकरांनी शनिवारी रात्री ११ ते १ वाजेपर्यंत मुंबईकरांनी घेतला. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकाची लगबग सुरू होती. मात्र, माईम आर्ट अँड कल्चर या संस्थेच्या कुणाल मोतलिंग आणि टीमने मुंबईकरांचे नववर्ष ‘स्पेशल’ करण्यासाठी मेहनत घेतली. विदेशात रूढ असलेला ‘स्ट्रीट माईम’चा थरार मुंबईकरांनी पहिल्यांदाच अनुभवला.
शहरातील कुलाबा, मरिन ड्राइव्ह आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) येथे रात्री शनिवारी ११ ते १ वाजेपर्यंत मूकनाट्याचे सादरीकरण केले. नागरिकांनाच प्रत्यक्षात सहभागी करून घेत, संस्थेच्या सात कलाकारांनी मूकनाट्याचे सादरीकरण केले. हे सादरीकरण पाहाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्यात आली होती.
कुणाल मोतलिंग यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्निल गटवे, प्रमोद गुतूकडे, कुणाल काटे, सुयोग आंब्रे, प्रणय फडतरे, सागर चव्हाण आणि दीप नाईक यांनी नववर्षाच्या मुहूर्तालाच तमाम मुंबईकरांची मने जिंकली.