मुंबई : कर्ज म्हणून दिलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग करत तिला मारहाण केल्याचा प्रकार मालाडमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी शुक्रवारी तिघांना अटक केली असून चौकशी सुरू आहे. नारायण रहेजा (५८), गोपाल रहेजा (२०) व लोकेश रहेजा (२८) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.चारकोप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मीनाक्षी नंदा (३०) या गोराईत पती आणि मुलासोबत राहतात. त्यांचे पती व्यावसायिक आहेत, तर मुलगा शाळेत शिकतो. मालाडमध्ये राहणारी गायत्री रहेजा (२०) ही नंदा यांच्या मुलाची शिकवणी घ्यायला यायची. यातून त्यांची ओळख झाली. याच दरम्यान रहेजाला पैशांची गरज असल्याचे तिने नंदा यांना सांगितले. पैसे लवकर देण्याच्या शर्तीवर नंदा यांनी रहेजाच्या बँक खात्यात दहा लाख रुपये पाठवले. त्याच्या बदल्यात रहेजाकडून एक चेक घेतला. मात्र, ठरल्या वेळेनुसार नंदा यांनी जेव्हा चेक बँक खात्यात जमा केला तेव्हा तो बाऊन्स झाला. यावरून नंदा आणि रहेजामध्ये वाद झाले. अखेर नंदाने रहेजाच्या घरी जाऊन पैसे मागण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्या रहेजाच्या घरी पोहोचल्या. त्या ठिकाणीदेखील पैशांवरून त्यांच्यात वाद झाले आणि नंदा यांना रहेजा कुटुंबीयांनी मारहाण करत त्यांचा विनयभंग केला. या प्रकरणी नंदा यांनी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चौकशीअंती तिघांना पोलिसांनी अटक केली.
कर्जाचे पैसे परत मागितले म्हणून महिलेचा विनयभंग आणि मारहाण, मालाडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 9:54 AM