भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयात विनयभंग; मुंबईत खळबळ, आता ‘ताईगिरी’ करणार नाही का?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 01:36 PM2021-09-23T13:36:13+5:302021-09-23T13:43:58+5:30
मुंबईत भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग आणि मारहाण झाल्याचा आरोप झाल्यानंतर आता सत्ताधारी पक्षाने भाजपाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचारावरुन विरोधक सरकारची कोंडी करत आहेत. त्यातच आता विरोधी पक्ष भाजपाच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची तक्रार पुढे आल्यानं सत्तेतील तिन्ही पक्षांनी भाजपाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर बोरिवली पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. तर विनाकारण आरोप करण्यापेक्षा नार्को टेस्ट करून सत्य बाहेर येऊद्या असं भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी म्हटलं आहे.
या प्रकरणावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या की, भाजपा पदाधिकारी महाविकास आघाडी सरकारवर टीका करतात. त्यांनी दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा तुमच्या इथं कार्यालयात काय चाललंय त्याकडे लक्ष द्या. पीडित महिलेने हा आरोप लावला आहे. दिव्याखाली अंधार असा भाजपाचा कारभार आहे. राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी या पीडित महिलेची भेट घेतील. यातील दोषींना कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी त्यांनी केली आहे.
तर ती महिला पद मागायला आली होती. तेव्हा आम्ही पदं वाटप करत नाही तुम्ही वरिष्ठांकडे जा असं मी सांगितले. त्यानंतर या महिलेने आमच्यावर खोटे आरोप करण्यास सुरुवात केली. १५ ऑगस्टला झेंडावंदन करून आम्ही सगळे घरी गेलो मग हा प्रकार झालाच नाही. ऑफीसची चावी माझ्याकडेच असते त्यामुळे असा काही प्रकार घडलाच नाही. २०२० मधील हा प्रकार आहे मग वर्षभर ही महिला कुठे होती? एखाद्या महिलेवर असा गुन्हा घडला असेल तर त्या गप्प का? पद दिलं नाही म्हणून आरोप केले जातात. हे घाणेरडे राजकारण केले जातंय असं भाजपा नगरसेविका अंजली खेडेकर यांनी आरोपाचं खंडन केले आहे.
दरम्यान, दुपारी ४ वाजता बोरिवली पोलीस ठाण्यात भेट देणार असून पीडित महिलेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही मुंबई बदनाम करणार, महाराष्ट्र बदनाम करणार, आता ताईगिरी करणार नाही? असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. तर भाजपा कार्यकर्त्यांची नार्को टेस्ट करा, वर्षभरापासून ही महिला पुढे आली नाही. जर तिच्यावर खरोखरचं अन्याय झाला असेल तर कारवाई होईल. पण विनाकारण आरोप लावले जाऊ नये असं खासदार गोपाळ शेट्टी यांनी म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
डित महिलेला समाजसेवेची आवड असल्याने ती २०२० मध्ये खेडेकर यांच्या संपर्क कार्यालयात आली होती. तिथे तिची प्रतीक साळवीशी भेट झाली. त्यांनी एकमेकांचे मोबाइल क्रमांकही घेतले. साळवीने या महिलेला १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास खेडेकर यांच्या वझीरा नाका येथील कार्यालयात बोलावले आणि तिच्या मांडीला हात लावून विनयभंग केला. याची तक्रार तिने स्थानिक खासदार आणि आमदार यांच्याकडे केली. हे कळताच, नगरसेविका खेडेकर यांनी तिला फोन करून कार्यालयात बोलावून घेतले आणि तक्रार का केली? अशी विचारणा केली. साळवीने तिच्याशी केलेल्या अश्लील वर्तनाबाबत तिने खेडेकर तसेच इतर उपस्थितांना सांगितले. तेव्हा दुसऱ्या एका महिलेने तिला मारले. इतरांनीही तिला मारहाण करीत ऑफिसबाहेर हाकलले, असा आरोप पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात केला.